मुंबई-”छत्रपती शिवाजी महाराज सूर्य आहे. त्यांची तुलना करण्याचा मूर्खपणा कोणी कसा करेल, मी तर कधीच नाही करणार.” असे स्पष्टीकरण भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहे .शिवतप्रताप दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही मंत्री प्रतापगडावर गेले होते. या ठिकाणी विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आलेले होते. दरम्यान, या ठिकाणी भाषण करताना भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या एका विधानाने आता आणखी एक नवा वाद उफाळण्याचे चिन्हं दिसत आहेत. राज्यपाल कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते त्रिवेदींनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आता मंगलप्रभात लोढांचं वक्तव्य समोर आलं आहे. यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार, आदित्य ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांकडून लोढांवर टीका करण्यात आली आहे. या पार्श्वबूमीवर मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकारपरिषद घेत आपली बाजू मांडली आहे.
लोढा म्हणाले, विरोधक काय बोलतील, त्यांचा तो अधिकार आहे. पण जे काही झाले. टीव्ही किंवा सोशल मीडियावर सुरू आहे. जे राष्ट्रवादीचे नेते बोलत आहेत, मी काय सांगितलं हे त्यांनी बघितलेच असेल का? त्यांनी नाही बघितले. मी फक्त उदाहरण दिले होते. मी कधीही तुलना केली नाही आणि मीच काय तर कोणीही करू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज सूर्य आहे. मग त्यांची तुलना करण्याचा मूर्खपणा कोणी कसा करेल, मी तर कधीच नाही करणार.मी कधी वैयक्तिक टिपण्णी करत नाही. मी कधी राजकारणात जात नाही. सरकारचे काम सकारात्मकतेने करायचे आहे. महाराष्ट्रात फार समस्या आहेत. माझ्या विभागामार्फत मी त्या सोडवण्याच्या प्रयत्नात असतो. राजकारणात आजपर्यंत गेलो नाही आणि नंतरही जाणार नाही. हे जे काही झाले ते आता बंद करायला हवे.
लोढा म्हणाले,आरोप करणे हा लोकशाहीत विरोधी पक्षाचा अधिकार आहे, सर्वांचाच अधिकार आहे आणि आम्ही त्याची उत्तरेही दिली पाहिजे. यासाठीच तुमच्या समोर आलो आहे. मी माझ्या वक्तव्यात तुलना केली नाही, मी उदाहरण दिले. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण प्रत्येक मुलाला दिले जाते. मुलांना जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण दिली जाते. त्यामध्ये काय त्यांची तुलना केली जाते का? नाही ना.
राजकारण होऊ नये
लोढा म्हणाले, माझ्या वक्तव्यावरून जे राजकारण होत आहे ते व्हायला नको. छत्रपती शिवाजी महाराज चमकणारा सूर्य होते, त्यांची त्याच स्थानवर पूजा केली पाहिजे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांना वादात आणणं बंद झालं पाहिजे.” असंही यावेळी लोढा म्हणाले.