मुंबई-विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पाचही उमेदवार विजयी झाल्यानंतर आता महाविकास आघाडीला हादरे बसू लागले आहेत. शिवसेनेचे महत्वाचे नेते एकनाथ शिंदे गुजरातमध्ये असल्याने राजकीय चर्चांना ऊधाण आले आहे. दरम्यान, काँग्रेसमध्येही आता धुसपूस पाहायला मिळत असून, मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
सोमवारी विधान परिषदेची निवडणूक झाली असून, त्यात काँग्रेसचा एक उमेदवार पराभूत झाला. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी विधान करत म्हटले की, “या पराभवाची जबाबदारी मी घेतो” काँग्रेसच्या पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभूत झाला आहे. त्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी पाहायला मिळत आहे. काँग्रेसला 44 पैकी 41 मते मिळाली आहेत. म्हणजे काँग्रेसचे 3 मते फुटली आहेत. सोमवारी निवडणुकीचा कल हाती येताच बाळासाहेब थोरात यांनी पराभव पत्कारत “आमच्या पक्षाची मते फुटली इतरांना काय दोष घ्यायचा” असे म्हटले होते. त्यानंतर आता थोरात विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
विचार करण्याची गरज
सोमवारी विधान परिषदेचे निकाल जाहीर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आमच्याच पक्षाची मतं जर फुटत असतील तर दुसऱ्यांना दोष देऊन काय फायदा? इतरांना दोष देण्याचा मुद्दाच नाही. आता आम्हाला विचार करण्याची गरज आहे. 2.5 वर्ष सत्तेत राहूनही जर आमदारांमध्ये नाराजी असेल तर नेमके कुठे का चुकते याचा विचार करण्याची गरज आहे.”
शिंदे नॉट रिचेबल
शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाचे तब्बल 13 आमदार नॉट रिचेबल आहेत. यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. महसूल मंत्री असलेले बाळासाहेब थोरात विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
काँग्रेस नेते दिल्लीला जाणार
राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि आमदार आज दिल्लीला जाणार आहेत. विधान परिषदेतील पराभवानंतर काँग्रेस नेते पक्ष नेतृत्त्वाची भेट घेणार आहेत. महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे झाली आहेत. आता सरकार म्हणून आम्हाला विचार करावा लागेल, अशी भूमिका बाळासाहेब थोरात यांनी मांडली आहे.