५ ते २२ वर्षांपासून काहींनी घेऊन ठेवलेल्या न्यायालयीन स्थगितीने कारवाई प्रलंबित -प्रशासन
पुणे : गेल्या महिन्याभरापासून महापालिकेकडून अतिक्रमणांवर जोरदार कारवाई सुरू केलेली असताना आज म्हात्रे पूल ते राजाराम पूल या दरम्यानची नदी पात्रालगतचे हॉटेल, मंगलकार्यालय, गॅरेजसह इतर अनधिकृत बांधकामावर अखेर बुलडोझर चढविला.गेली ५ ते २२ वर्षांपासून या कारवाई ला न्यायालयातून स्थगिती मिळविलेले ५ जण कारवाईतून सुटले. आता यापुढे कोणी स्टे घेऊ नये म्हणून महापालिका प्रशासनाने धडक कारवाईसाठी अगोदरच कोर्टात कॅव्हेट दाखल करून हि कारवाई केली.गेल्या ५ वर्षातील हि मोठी कारवाई असून ती आयुक्त विक्रम कुमार यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत झाली मात्र या समयी आयुक्त परदेशी गेल्याचे सांगण्यात येत होते.मात्र या कारवाईने अन्याय केल्याची भावना कारवाईग्रस्त व्यावसायिकांनी व्यक्त केली.२ वर्षे कोरोना महामारीत गेल्यावर आता प्रशासकीय महामारी सुरु झाल्याची भावना त्यांनी बोलून दाखविली तर आज आणि येत्या २/५ दिवसात ज्यांनी येथे लग्नांसाठी कार्यालये बुकिंग केलेली होती त्या त्या कुटुंबांची, विशेषतः वधु पिता आणि लग्नघरांमधील चिंता मात्र भयंकर वाढलेली दिसली.तर दुसरीकडे केवळ फेरीवाले, पथारीवाले यांच्यावर कारवाई करणाऱ्या महापालिकेने, राजकीय वरदहस्त लाभलेल्या बड्या मंडळींच्या अतिक्रमणांवर कारवाई करून कारवाईत भेदभाव नाही हे कृतीतून दाखवून देण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे.
आज भल्या सकाळी साडे सात वाजता महापालिकेने ही कारवाई सुरू करून दुपारी एक पर्यंत ६८ अतिक्रणांवर कारवाई करून तब्बल अडीच लाख चौरस फूट जागा मोकळी केली.महापालिकेवर प्रशासक आल्यानंतर शहरातील अतिक्रमणे, फ्रंट व साइड मार्जिनमधील बांधकाम, शेडे यावर अतिक्रमण विभाग, बांधकाम विभागाकडून संयुक्त कारवाई केली जात आहे. महापालिकेच्या कारवाईत व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याने खराडी भागात पथावर हल्ला देखील झाला, त्यानंतरच महापालिकेने कारवाई अधिक कडक केली आहे.
म्हात्रे पूल ते राजाराम पूल या दरम्यान सुमारे दीड किलोमीटरच्या रस्त्यावर नदी पात्राच्या बाजूने अनेक मंगलकार्यालय आहेत. गेल्या काही वर्षात या रस्त्यावर विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांची रेलचेल असलेले हॉटेल सुरू झाली. त्यामुळे संध्याकाळनंतर मोठी गर्दी या भागात होते. महापालिकेने यापूर्वी एखाद दुसऱ्या मंगल कार्यालयाच्या अतिक्रमणांवर कारवाई केली, पण सरसकट सर्वच व्यावसायिकांवर कारवाई केली नव्हती.आज महापालिकेने नोटिसा बजावून पोलिस बंदोबस्तात कारवाई केली.
सकाळी सहा पासून महापालिकेने साहित्याची जमवाजमव सुरू केली. साडे सात वाजता कारवाई सुरू होताच या भागातील व्यावसायिकांची धांदल उडाली. कारवाई थांबविण्यासाठी परिसरातील हॉटेल, मंगलकार्यालय चालकांनी राजकीय नेत्यांचा दबाव आणून कारवाई थांबविण्याची मागणी केली, पण प्रशासनाने त्यास न जुमानता कारवाई केली.
या कारवाईत २० जेसीबी, ९ गॅस कटर, ३ ब्रेकरचा वापर केला. जेथे जेसीबी जाऊ शकत नाही, तेथे गॅस कटरचा वापर करून आतमध्ये घुसून शेड तोडण्यात आले. आठ पथकांच्या माध्यमातून एकाच वेळी कारवाई सुरू झाली. जेसीबने थेट बांधकाम, पत्र्याच्या शेडवर वार केला जात असल्याने हॉटेल, दुकाने, गॅरेजमधील साहित्याचे नुकसान झाले.कार्यकारी अभियंता बिपिन शिंदे म्हणाले, ”अतिक्रमण विभाग व बांधकाम विभागाने संयुक्तपणे कारवाई केली आहे. ही कारवाई करण्यापूर्वी ७३ जणांना नोटिसा दिल्या होत्या. त्यातील चार हॉटेल व एक मंगलकार्यालयावरील कारवाईस न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे उर्वरित सर्वांवर आठ पथकांच्या माध्यमातून कारवाई केली. यात तीन पोलिस अधिकारी, २५ पोलिस कर्मचारी, महापालिकेचे २०० सेवक, सुरक्षारक्षक ६०, वाहने २५, तसेच २० जेसीबी, ९ गॅस कटर, ३ ब्रेकर याचा वापर करण्यात आला. आता हे अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण पाडण्यात आले आहे, याठिकाणी पुन्हा नव्याने अतिक्रमण होऊ नये याची काळजी घेतली जाईल.उपअभियंता सुनील कदम, दीपक मांजरेकर,दत्ता टाकले,योगेंद्र सोनावणे,हनुमान खलाटे,राजेश शिंदे,प्रताप धायगुडे,श्रीकांत गायकवाड,शाखा अभियंता राहुल रसाळे समीर गढई,रामदास पवार,गोपाल भंडारी,हेमंत कोळेकर ,निखील गुलेचा,प्रशांत मोरे किरण अहिरराव,कनिष्ठ अभियंता विठ्ठल मुळे,गजानन सारणे आणि आणखी ३२ अधिकाऱ्यांनी या कारवाईत सक्रीय सहभाग घेतला होता.

