पुणे -महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने ता. हवेली येथील मौजे गुजर निंबाळकरवाडी हिल टॉप हिल स्लोप वरील मुळीक नगर येथे वन विभागाजवळील सर्वे नंबर १०/२/१ ब मधील १६ हजार स्क़्क़ेअर फूट (१४५०.०० चौ.मी.) आकारातील G+३ अनधिकृत नियोजित शाळेचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायतीची परवानगी आहे असे सांगून होणाऱ्या अनधिकृत बांधकामांची खरेदी करू नका ,अन्यथा फसाल ,फटका बसेल असा इशारा पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिला आहे
प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५३ (१) अन्वये संबधिताना प्रत्येकी दोनदा नोटीसा देऊनही त्यांनी अनधिकृत बांधकामे सुरु ठेवली होती. सदरील बांधकाम आरसीसी स्वरुपात दुमजली स्वरूपातील हे बांधकाम होते. दिनांक ०५ जून २०१८ रोजी अनधिकृत बांधकाम निष्कासनाची कारवाई पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम व निष्कासन पथक क्रमांक एक मार्फत पार पडली.
पीएमआरडीएचे पोलीस निरीक्षक राजकुमार शेरे, (प्रभारी तहसीलदार) उपअभियंता राजेंद्र मेदनकर, उपअभियंता सुर्यकांत कापसे, सह्यक अभियंता राजेश्वर मंडगे, यु.बी. लोखंडे, कनिष्ठ अभियंता योगेश दिघे, सुजय पाटील तसेच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले, सहायक पोलीस निरीक्षक अमोल काळे, पोलीस उपनिरीक्षक भोलेश्वर अहिवळे, तसेच स्थानिक पोलीस कर्मचारी यांच्या बंदोबस्ताच्या नियंत्रणाखाली सदरील कारवाई पार पाडण्यात आली.
पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी नागरिकांना सदर सदनिका खरेदी करताना सावधगिरी बाळगावी. अनधिकृत सदनिका या स्वस्त दरात नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जातात, याकरिता नागरिकांनी जागरूक राहावे. शहानिशा करूनच सदनिका खरेदी कराव्यात. शासन निर्णय ७.१०.१७ नुसारच्या अटीनुसार ३१.१२.२०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमनाकुल करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे दि. २१ जून २०१८ पूर्वी अर्ज करून बांधकामे नियमनाकुल करून देण्यात येतील असे आवाहन केले आहे.