पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या आठ जागांसाठी सोमवारी घेण्यात आलेल्या मुख्य सभेमध्ये नव्या सदस्यांची निवड करण्यात आली. भाजपाने त्यांच्या वाट्याच्या चारही जागांवर महिलांना संधी दिली आहे. तर, राष्ट्रवादीने दोन आणि काँग्रेसने एका जागेवर महिलेला संधी दिली आहे. त्यामुळे सोळा सदस्य संख्या असलेल्या स्थायी समितीमध्ये महिलाराज आले आहे. भाजपकडून नगरसेविका वर्षा तापकीर, मानसी देशपांडे, उज्वला जंगले, सुनिता गलांडे यांना संधी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीने अमृता बाबर व नंदा लोणकर यांना संधी दिली असून काँग्रेसकडून लता राजगुरू यांची निवड करण्यात आली आहे. तर शिवसेनेने नगरसेवक बाळा ओसवाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
भाजपाच्या वर्षा तापकीर या महापौर पदासाठी इच्छुक होत्या. तर राष्ट्रवादीच्या नंदा लोणकर विरोधी पक्षनेते पदासाठी आग्रही होत्या. परन्तु, दोन्ही पक्षांनी संधी न दिल्याने त्या नाराज असल्याची चर्चा होती. दोन्ही पक्षांनी आपापल्या नगरसेवकांची स्थायी समितीवर वर्णी लावत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.भाजपचे दिलीप वेडेपाटील, रंजना टिळेकर, योगेश मुळीक, उमेश गायकवाड, काँग्रेसच्या वैशाली मराठे, राष्ट्रवादीच्या लक्ष्मी दुधाने, स्मिता कोंढरे या 7 सदस्यांचा 2 वर्षे कालावधी पूर्ण झाला होता. तर, शिवसेनेतर्फे आपल्या सदस्याला 1 वर्षाचा कालावधी देण्यात आला होता. विशाल धनवडे यांचा 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने बाळा ओसवाल यांना संधी देण्यात आली.भाजपने यावेळी केलेल्या चारही महिलांच्या निवडीमुळे पक्षांतर्गत नाराजीचे सूर उमटत असून ,स्थानिक नेतृत्वाला डावलून शहरात पक्षांतर्गत सुरु असलेल्या हालचाली पक्षाला रसातळाला नेतील असा इशारा या कुर्बुरीतून देण्यात येत होता .तर राष्ट्रवादी मध्ये लोणकर आणि बाबर यांना सदस्यत्व दिले गेल्याने त्यांची समजूत काढलीय असा सूर होता .शिवसेनेचे बाळा ओसवाल खरे तर आमदारकीचे उमेदवार म्हणून परिचित असताना त्यांना गेल्या विधान सभा निवडणुकीत युतीच्या राजकारणात माघार घेणे भाग पडले .त्यांना आता सदस्यत्व देवून समजूत काढण्याचा यत्न झालेला दिसतो आहे.
महापौर ,विरोधीपक्षनेता ,आमदारकीसाठी इच्छुक असलेल्याना पालिकेतील स्थायी समितीचे सदस्यत्व -भाजपच्या निवडीने पक्षांतर्गत कुरबुरी
Date:

