पुणे :पुणेकरांना २४ तास पाणीपुरवठा प्रकल्प करण्याची नितांत गरज आणि आवश्यक्यता किती आहे ; कि नाही ? हा प्रश्न सोडा … पण किमान ही योजना नेमकी कोणत्या उद्देशाने राबविण्याचा घाट घातला जातो आहे ? या प्रश्नावरच आता खल माजेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .
या योजनेच्या पूर्वीच्या पूर्वगणकपत्रातच (ईस्टिमेट) त्रुटी असल्याची बाब उघडकीस आली असून, त्यामुळेच योजनेतील कामांच्या रकमांचे आकडे फुगले होते, किंवा फुगविले होते असे आता स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे, ‘फायबर ऑप्टिकल केबल’साठी (डक्ट) दुप्पट दर लावल्याचे आता दिसून येत आहे. या योजनेद्वारे पुणेकरांचे कोट्यवधी रुपये हडप करण्याचा डाव रचल्याचा आरोप होत आहे.याआधी योजनेचे सुमारे 2 हजार 818 कोटी रुपयांचे ईस्टिमेट मंजूर करण्यात आले होते. मात्र, यावर प्रचंड आरोप झाल्यानंतर या योजनेच्या कामाच्या निविदा रद्द केल्या. त्यानंतर सुमारे 203 कोटी रुपयांची कपात करीत 2 हजार 615 कोटींचे सुधारित पूर्वगणकपत्र मांडले होते. त्यावरील चर्चेदरम्यान पूर्वीच्या ईस्टिमेट मध्ये कामांच्या खर्चाचे आकडे फुगविल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळेच दोनदा मांडण्यात आलेल्या ईस्टिमेट मधून पुणेकरांचे 493 कोटी वाचल्याचे स्पष्ट झाले. जुन्या ईस्टिमेटनुसार योजनेतील जलवाहिन्यांबरोबर सुमारे 277 कोटी रुपयांचे ‘डक्ट’ टाकण्याचा डाव होता; पण वाहिन्यांमध्ये ‘डक्ट’ टाकण्याचा दर 87 रुपये प्रतिमीटर धरला होता. हा दर दुप्पट असल्याचे कमिटीच्या निदर्शनास आल्याने तो 47 रुपयांपर्यंत आला. या कामात शंभर कोटी रुपयांची बचत झाली. आवश्यकता नसतानाही विशिष्ट प्रकारचे पाईप घेण्याचा प्रयत्न होता. त्यात, बदल केल्याने 60 कोटी वाचले आहेत. तसेच, ज्या तंत्रज्ञानाची गरज नव्हती, मात्र, त्याचा वापर आवश्यक असल्याचे सांगून आकडे वाढविल्याचेही दिसून आले. पुढील दहा वर्षांची देखभाल-दुरुस्ती आणि मीटर खरेदीच्या खर्चात 50 कोटींची कपात झाली आहे.
योजनेसाठी निधीची पूर्वी केलेली तरतूद
2 हजार 264 कोटी कर्जरोखे
500 कोटी (महापालिकेचा वाटा)
299 कोटी (स्मार्ट सिटीतून अपेक्षित, पुढील आठवड्यात निर्णय)
200 कोटी (अमृत योजना – हा निधी 50 कोटींनी वाढणार)
योजनेचा खर्च
पहिले एस्टिमेट
2 हजार 818 कोटी
दुसरे एस्टिमेट
2 हजार 615 कोटी
एस्टिमेट कमिटीने मंजूर केलेले अंतिम एस्टिमेट
2 हजार 325 कोटी