पुणे-गेल्या १ वर्षापूर्वी कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामावरून भाजपा आणि राष्ट्रवादी चा सभागृहात वाद झाल्यानंतर या रस्त्याचे काम अजूनही वादाच्या भोवऱ्यातून बाहेर पडू शकलेले नाही . २१५ कोटीचे हे काम वारंवार राजकीय हस्तक्षेप आणि प्रशासकीय कामकाजाच्या पद्धतीवरून रखडत आले आहे . आता कात्रज- कोंढवा रस्त्याच्या निविदेला दिलेली मुदतवाढ बेकायदेशीर आहे. निविदा कामकाज नियमाचे उल्लंघन झाले असुन निकोप दर्जाची स्पर्धा झालेली नाही. त्यामुळे ही निविदा रदद करुन फेरनिविदा काढावी अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल यांनी केली आहे.
पालिका आयुक्त कुणाल कुमार यांना दिलेल्या निवेदनात शहरातील कात्रज -कोंढवा रस्ता नव्याने तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी यापूर्वी काढण्यात आलेली निविदा वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे ही निविदा रदद करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
त्यानंतर या रस्त्याची पुन्हा निविदा काढण्यात आली. त्यावेळी या रस्त्याचे पुर्वगणनपत्रक २१५ कोटीचे आहे. मात्र या निविदेला नियमाबाहय १५ दिवसाची मुदतवाढ दिली आहे. पालिकेच्या निविदा प्रक्रियेचे नियम डावलुन बयाणा रक्कम डी डी. स्वरुपात घेउन गोपनीयतेचा भंग केला आहे. या मध्ये निकोप स्पर्धा झालेली नाही.
त्यामुळे ही निविदा रदद करुन फेरनिविदा काढण्यात यावी. ठेकेदाराची नावे उघड झाल्यामुळे स्पर्धेत वाव राहिलेला नाही. या कामाची निविदा पुन्हा नव्याने मागविण्यात यावी. या निविदेमधील जाचक अटी शर्ती शिथील करुन आणि जॉईंट व्हेंचरला मान्यता देऊन पूर्णतः पारदर्शक पध्दतीने निविदा प्रक्रिया राबवावी. निविदा प्रक्रियेचे तंतोतंत पालन न केल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा बाळा ओसवाल यांनी दिला आहे.
कात्रज- कोंढवा रस्ता २१५ कोटीचे काम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात..
Date: