पुणे-समान पाणीपुरवठा योजनेसाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेमधून १२५ कोटी रुपयांचे अनुदान देण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला. राज्य सरकारने दिलेल्या मंजुरीमुळे पालिकेला दिलासा मिळाला आहे.
शहरातील नागरिकांना चोवीस तास पाणी मिळावे, यासाठी पालिकेने समान पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे. कर्जरोखे उभारुन प्रकल्पाचा निधी गोळा केला जाणार आहे. योजनेसाठी सुमारे तीन हजार ३०० कोटी रुपये खर्च येणार असून, २२०० कोटी रुपयांचा निधी कर्जरोख्याद्वारे उभा राहणार आहे. योजनेसाठी केंद्र तसेच राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून निधी मिळविण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाने सुरू केला होता. समान पाणीपुरवठा योजनेतून शहरात ८२ पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी २४५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या खर्चातील ५० टक्के खर्च अमृत योजनेतून देण्याची तयारी राज्य सरकारने दर्शविली होती.
अमृत योजनेमधून योजनेसाठी १२५ कोटी रुपयांचे अनुदान मिळण्यासाठीचा प्रस्ताव पालिकेने राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला होता. याबाबत मंगळवारी मुंबईत नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्याकडे बैठक झाली. बैठकीला पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी उपस्थित होते. या बैठकीत अमृत योजनेतून १२५ कोटी देण्यास मंजुरी देण्यात आली. पुढील महिनाभरात हा निधी पालिकेला मिळणार आहे.