पुणे-केरळ येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी सरसावले आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठीची तयारी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी दाखविली होती.पूरग्रस्तांना मदत म्हणून प्रत्येक नगरसेवकाने आपल्या वॉर्डस्तरीय निधीतून एक लाख रुपये द्यावेत, असा ठराव उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी दिला आहे.मात्र अद्याप नगरसेवकाच्या मानधनातून किती रक्कम द्यावी याबाबत चा निर्णय झाला नसल्याचे समजते .केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासदांनी एक महिन्याचे मानधन देण्याचे जाहीर केले होते.
महापालिकेत कर्मचारी, अधिकारी यांची संख्या सुमारे १९ हजार आहे. त्यानुसार प्रत्येकाच्या पगारातून ही रक्कम कापून घेतली जाणार आहे. पालिका आयुक्त सौरभ राव यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. अतिवृष्टीमुळे केरळमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केरळमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी तसेच मनुष्यहानी झाली आहे. या आपतकालीन परिस्थितीमध्ये तेथील नागरिकांना आर्थिक मदतीची गरज असल्याने पालिकेतील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आला होता. पालिकेच्या मुख्य लेखा आणि वित्त अधिकाऱ्यांमार्फत ही रक्कम गोळा केली जाणार आहे. त्यानंतर ‘केरळ मुख्यमंत्री सहाय्यता निधी’च्या नावाने धनादेश काढून मदत दिली जाणार आहे.