पुणे – पौडफाटा उड्डाणपूलावरून थेट शिवणेपर्यंत आता मेट्रो करण्यासाठी स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत त्यासंबंधीच्या प्रकल्प अहवाल करण्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.मेट्रो पुण्याच्या चारही दिशेला व्हावी,प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावी यासाठी आमचे प्रयत्न असतील असे यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले .
ते म्हणाले कि ,कोथरूड गाव, कर्वेनगर, वारजे, डहाणूकर कॉलनी, नवसह्याद्री, हिंगणे, हॅपी कॉलनी, वारजे जकातनाका परिसर, कमिन्स कॉलेज परिसर हा सध्या मोठ्या लोकसंख्येचा भाग झाला आहे. तसेच या परिसराला आता शिवणे, उत्तमनगर ही गावेही जोडण्यात आली आहेत. त्यामुळे या भागात होणारे औद्योगिकीकरण, माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचा विस्तार आणि वाढते नागरिकरण लक्षात घेता मेट्रो शिवणेपर्यंत धावावी, असा प्रस्ताव स्थायी समोर मी ठेवला होता त्याला स्थायीने मंगळवारी मंजुरी दिली. मेट्रोच्या या विस्तारित प्रकल्पासाठी अहवाल तयार करण्याला “महामेट्रो’ला सांगण्यात येणार आहे. त्यामुळे त्यानुसार येथील कामालाही लवकरच सुरूवात होईल.

