पुणे-पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली असून औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त करण्यात आले आहे.
पुणे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांचा साडेतीन वर्षांचा कालावधी झाल्याने मागील महिन्यात त्यांची बदली झाली होती. त्यांनी आयुक्तपदाचा कार्यभार शासन आदेशानुसार दहा दिवसांपूर्वी सोडल्याने त्यांच्या जागी कोण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यापदावर जिल्हाधिकारी सौरभ राव यांचीच नियुक्ती केली जाईल अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. सौरभ राव यांना जिल्ह्यासह महापालिकेचे कामकाज आणि शहराच्या प्रश्नांविषयी माहिती असल्याने राज्यशासनाकडून त्यांची नियुक्ती होईल असे बोलले जात होते. सौरभ राव यांची नियुक्ती सत्ताधारी भाजपला फायदेशीर ठरणार आहे. त्यांच्या जिल्हाधिकारी पदाच्या कार्यकाळात पुरंदर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासह अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. महापालिका क्षेत्रातील कामेही गतीने पूर्ण होतील, असे बोलले जात आहे.
दरम्यान, औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राज्यात काही अधिकाऱ्यांचीही बदली झाली आहे. त्यामध्ये राहुल द्विवेदी हे अहमदनगरचे नवे जिल्हाधिकारी असतील. तर नगरचे विद्यमान जिल्हाधिकारी अभय महाजन यांची मुंबई येथे पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागात बदली झाली आहे.