पुणे : पुणे महापालिकेच्या विषय समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून, या समित्यौपकी महत्त्वाच्या शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदाची माळ तरुण नगरसेवक सुशील मेंगडे यांच्या गळ्यात पडणार आहे.भाजपच्या जुन्या निष्ठावंत परिवारातील सध्याची तरुणाई म्हणून सुशील मेंगडे यांच्याकडे पाहिले जाते .
महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदासाठी नगरसेविका राजश्री नवले यांना संधी मिळाली आहे. तर, विधी समितीकरिता माधुरी सहस्त्रबुध्दे आणि क्रीडा समितीच्या अध्यक्षपदासाठी राहुल भंडारे यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. विशेष म्हणजे, चारपैकी तीन समित्यांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी भाजपने पहिल्यांदाच निवडून आलेल्या सदस्यांवर सोपविली आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा विचार करून ही नावे निश्चित केल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले. महापालिकेच्या विषय समित्यांची मुदत संपल्याने त्यांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपसाठी येत्या नऊ एप्रिलला निवडणूक होत आहे. त्यासाठी मेंगडे, नवले, भंडारे आणि सहस्त्रबुध्दे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. सभागृहातील संख्याबळानुसार चारही समित्यांचे अध्यक्षपद भाजपकडे राहणार आहे. समितीचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी इच्छुकांनी मार्चेबांधणी केली होती. त्यामुळे या पदांसाठी भाजप कोणाला संधी देणार, याबाबत पक्ष वर्तुळात उत्सुकता होती.
त्यात शहर सुधारणासाठी मेंगडे यांचे, तर महिला व बालकल्याण समितीसाठी नवले यांचे नाव पक्षाने निश्चित केले आहे. क्रीडा समितीसाठी भंडारे यांच्या नावाला पसंती मिळाली. हे तीनही सदस्य पहिल्यांदाच निवडून आले आहेत. विधी समितीसाठी अर्ज भरलेल्या सहस्त्रबुध्दे दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. या आधी मेंगडे यांच्याकडे वारजे-कर्वेनगर प्रभाग समितीचे अध्यक्षपद होते.
शहर सुधारणा समितीच्या उपाध्यक्षपासाठी अजय खेडेकर, महिला व बालकल्याण समितीसाठी दिशा माने, क्रीड समितीच्या साठी जयंत भावे तर विधी समितीच्या उपाध्यक्षपसाठी विजय शेवाळे यांनी अर्ज भरला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसतर्फे शहर सुधारणा समितीसाठी भैय्यासाहेब जाधव, लक्ष्मी आंदेकर, महिला व बालकल्याण समिती परवीन शेख, चांदबी नदाफ, क्रीडा समितीसाठी वनराज आंदेकर, अशोक कांबळे यांनी अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे.

