पुणे- ‘एक वर्ष अंधकाराचे’ या नावाने राष्ट्रवादीने महापालिकेच्या सत्ताधारी भाजपा च्या विरोधात लाल महालावरून थेट महापालिकेवर मोर्चा नेला . मात्र कोणीही पदाधिकारी ,वरिष्ठ अधिकारी या मोर्चाला सामोरे गेले नाहीत . यावेळी केवळ स्थायीसामिती अध्यक्ष योगेश मुळीक महापालिकेत होते. आयुक्त ,अतिरिक्त आयुक्त , महापौर ,उपमहापौर, सभागृह नेते … मोर्चा आला तेव्हा महापालिकेत नव्हते. मात्र सुरक्षा विभागाचे प्रमुख उमेश माळी यांनी महापालिकेचे सर्व दरवाजे कुलूप बंद करून आतूनच विरोधीपक्षनेते चेतन तुपे यांच्याशी काही क्षण चर्चा केली. अखेर महापालिकेच्या बंद गेट समोर भाषणे देऊनच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोर्चाची सांगता केल्यानंतर, कार्यकर्त्यांची पांगापांग झाल्यानंतर महापालिकेचे दरवाजे उघडले गेले . आणि मोर्चातील नगरसेवक ही नंतर आत आले .
भारतीय जनता पक्षाच्या महापालिकेतील सत्तापूर्तीला एक वर्ष पूर्ण झाले. पालिकेतील सत्ताधारी सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप करत वर्षभरातील भाजपच्या कारभाराबद्दल असंतोष व्यक्त करण्यासाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ‘एक वर्ष अंधकाराचे’ या नावाने महापालिकेवर निषेध मोर्चा काढला . या मोर्चात सहभागी झालेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी काळे फेटे व काळे टीशर्ट परिधान करून भाजपच्या वर्षपूर्तीचा दिवस काळा दिवस म्हणून पाळला. दरम्यान, या मोर्चात बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास विरोध दर्शवण्यासाठी बालंगंधर्व व महापुरुषांच्या वेशभुषा करुन कलाकार सहभागी झाले होते.
लाल महाल येथून ‘एक वर्ष अंधकाराचे’ या नावाखाली हा निषेध मोर्चा काढण्यात आला. तो शनिवार वाड्यास वळसा घेऊन बाजीराव रस्त्यावरून शिवाजी पूल मार्गे पालिकेवर काढण्यात आला. मोर्चा पालिकेसमोर आल्यानंतर पालिकेसमोर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. मोर्चेकऱ्यांनी पालिकेच्या गेटला गाजराचा हार घालून सत्ताधाऱ्यांचा निषेध केला.
देश, राज्य आणि पालिकेत सत्तेवर असलेल्या भाजपने नागरिकांना पोकळ आश्वासने देण्यापलिकेडे काहींही केले नाही. निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांपैकी कोणतेही आश्वासन सत्ताधार्यांनी पूर्ण केले नाही. जनतेची दिशाभूल करण्याचे आणि फसव्या योजना जाहीर करण्याचेच काम सत्ताधार्यांनी आजवर केले आहे. भाजपची सत्ता येऊन वर्षपूर्ती होत आहे. ही भाजप सत्तेची वर्षपूर्ती नसून, पुणेकरांच्या अंधकाराची वर्षपूर्ती आहे. पुणेकरांनी अत्यंत विश्वासाने विकासासाठी महापालिकेत भाजपला सत्ता दिली; परंतु गुंडगिरी, निविदांमध्ये संगनमताच्या प्रकारे नातेवाईकांना विकास कामे देणे, भ्रष्टाचार यांचे प्रमाण वाढले आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला.
दीपक मानकर म्हणाले, ‘‘सत्ताधाऱ्यांनी पुणेकरांना गाजर दाखविण्याचेच काम केले आहे. दुर्बल घटकांसाठी पूर्वी सुरू असलेल्या योजना या सत्ताधाऱ्यांनी बंद केल्या आहेत. बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास आमचा ठाम विरोध आहे. शिवसृष्टीच्या बाबतीतही या सरकारने फसवणूक केली आहे. प्रत्येक जाती धर्माला वेगळ्या ठिकाणी घेऊन जाण्याचे काम या सरकारने केले आहे.’’
चेतन तुपे म्हणाले, ‘‘पराभवामुळे विरोधकांच्या डोळ्यावर अंधारी आली म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचारी आणि दिशाहीन कारभार पाहुन पुणेकरांच्या डोळ्यावर अंधारी आली आहे. ज्या दिवशी पुणेकरांच्या डोळ्यावरील अंधारी दूर होईल तेव्हा ते तुम्हाला घरचा रस्ता दाखवतील.
कॉग्रेस कार्यकर्ते व नेत्यांची पाठ :
पालिकेत सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण झालेल्या भाजपचा निषेध करण्यासाठी सुरुवातीस पालिकेतील विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे या निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात कॉग्रेस पक्षही सहभागी होणार असल्याचे आणि हा मोर्चा आघाडीतर्फे काढण्यात येणार असल्याचे कॉग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे व राष्ट्रवादीचे चेतन तुपे यांनी जाहीर केले होते. मोर्चात सहभागी झालेल्या रथावरही आघाडीतर्फे मोर्चा असे नमूद केले होते. प्रत्येक्षात मात्र, या मोर्चात कॉग्रेसचे कोणीही कार्यकर्ते किंवा नेते सहभागी झाले नाहीत.