पुणे- सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळकच आहेत. त्याविषयीचे संदर्भ ‘श्री भाऊ रंगारी गणपती ट्रस्ट’नेच तपासून पहावेत, असे महापौर मुक्ता टिळक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.तर गणेशोत्सवाचे जनक हे भाऊसाहेब रंगारी हेच आहेत असा दावा करीत खोटा इतिहास मांडू नये असे आवाहन माजी महापौर प्रशांत जगताप यांनी केल्याने गणेशोत्सवाचे जनक कोण यावरून आता पालिकेतही कलगीतुरा रंगणार आहे हे स्पष्ट झाले आहे . दरम्यान शिवसेनेचे संजय भोसले यांनी मात्र आपल्याला जनक कोण यापेक्षा गणेश उत्सव कसा चांगला होईल यात रस असल्याचे म्हटले आहे तर कॉंग्रेसचे अरविंद शिंदे यांनी मात्र उत्सवाच्या बोध चिन्हावर टिळकांबरोबर भाऊसाहेब रंगारी यांचाही फोटो लावावा अशी सामोपचाराची भूमिका घेणारी मागणी महापौरांकडे केली आहे .
भाऊ रंगारींनीच सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केल्याचे अनेक दाखले आहेत. याशिवाय राज्यसरकारनेही ते मान्य करून त्या विषयीचा अहवाल दिला आहे, असे असताना सार्वजनिक गणेशोत्सवाला मागील वर्षीच 125 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे पुन्हा 125 वे वर्ष साजरे करण्याचे काहीच कारण नाही, असा युक्तीवाद करत महापौरांनीच हा वाद उकरून काढल्याचा आरोप ‘श्री भाऊ रंगारी गणपती ट्रस्ट’चे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, सचिव राजेंद्र गुप्ता आणि खजिनदार अनंत कुसुरकर यांनी केला होता.
या संदर्भात सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांना आणि महापौरांनाही पत्र दिले आहे. तावडे यांना ट्विटरवरून, इमेलद्वारे कळवले आहे. तसेच मागील वर्षी आणि यावर्षी देखील या संबंधीचे सर्व पुरावे दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सरकारनेच या संबंधीचे पत्र दिले आहे आणि सरकारच आता 125 वे वर्ष साजरे करत आहे आणि त्यासाठी तरतूद केली आहे. जर सरकारने स्वत: दिलेले पत्र खोटे असेल तर सरकारनेच स्वत: चुकल्याचे सांगावे, अशी या ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे.
मात्र, महापौरांनी हा विषय मान्य केला नाही. ज. स. करंदीकर यांनी टिळकांवरील लिहिलेल्या पुस्तकातही लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केल्याचा संदर्भ आहे. इंग्रजी शिक्षण आणि बोलण्यात शिथिलता येत असल्याचे लक्षात आल्याने ती घालवण्यासाठी धर्माचा आधार घेत लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केल्याचे महापौर म्हणाल्या.