पुणे : भारतीय जनता पक्षाची आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर पुणे महापालिकेची निवडणूक एकत्र लढविण्यासाठी नेत्यांच्या आग्रहपूर्वक भूमिकेमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अखेर आघाडीझाल्याचे वृत्त आहे . मात्र, काही जागांवर अखेरपर्यंत एकमत होत नाही तेथे मैत्रिपूर्ण लढतीचा पर्याय स्वीकारण्यात आला.म्हणजे काही ठिकाणी आघाडी तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत अशा द्विधा अवस्थेत हि निवडणूक लढविण्याचा प्रकार होणार असल्याचे आज येथे वृत्त होते. मात्र अधिकृतरीत्या बोलायला दोन्ही पक्षांचे नेते अध्यक्ष माध्यमांपुढे सायंकाळपर्यंत आले नाहीत . यामुळे इच्छुकांची मोठी गोची होऊन बसली होती . दुसरीकडे काही उमेदवार ज्यांना निवडणूक लढवायचीच आहे अशांनी आघाडीच्या बैठका , चर्चांकडे ढुंकूनही पहायचे नाही प्रचार सुरु ठेवायचा अशी भूमिका घेतली होती .
यापूर्वी दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली होती. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शहराध्यक्ष वंदना चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांची संयुक्त बैठक अगोदर विश्वजित कदम यांच्या बंगल्यावर झाली त्यानंतर हॉटेल वेस्ट इन येथे झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. यानुसार सुमारे सात जागांवर दोन्ही काँग्रेसमध्ये मैत्रिपूर्ण लढती होणार असून, उर्वरित जागांवर आघाडीतर्फे उमेदवार दिला जाणार आहे. आघाडीच्या जागा वाटपाच्या प्रस्तावाला मान्यता घेण्यासाठी डॉ. कदम आणि बागवे हे मुंबई येथील प्रदेश कार्यालयात गेले असल्याची माहिती मिळाली आहे.
सुरवातीला काँग्रेसने 72 जागांचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसला दिला होता. तो फेटाळून अवघ्या 46 जागा देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसेच्या शहरातील नेत्यांनी दाखविली होती. त्यानंतर होणाऱ्या प्रत्येक बैठकीत आघाडीतील आकडे बदलत गेले. पण, अखेर 18 प्रभागांवर गेल्या दोन दिवसांपासून एकमत होत नव्हते. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याचे संकेत दोन्ही काँग्रेस नेत्यांनी दिले होते. आता लढण्यासाठी ६७ जागा कॉंग्रेसला मिळतील उर्वरित जागांवर राष्ट्रवादी लढेल असे सांगण्यात येत आहे