पंतप्रधानांनी तामिळनाडूमध्ये 11 नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि सीआयसीटीच्या नवीन संकुलाचे उद्घाटन केले

Date:

वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर जागांची संख्या सुमारे 1 लाख 48 हजारांवर गेली आहे, 2014 मधील 82 हजार जागांच्या तुलनेत सुमारे 80% वाढ .

एम्सची संख्या 2014 मधील 7 वरून आज 22 इतकी झाली आहे

नवी दिल्‍ली, 12 जानेवारी 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तामिळनाडू मध्ये 11 नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तमिळ (CICT) च्या नवीन संकुलाचे  उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडविया, डॉ एल मुरुगन आणि डॉ भारती पवार, तमिळनाडूचे मुख्यमंत्री थिरू एम के स्टॅलिन उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना  संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, 11 वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तमिळच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनामुळे समाजाचे आरोग्य आणि त्याचबरोबर आपल्या संस्कृतीशी आपले नाते अधिक बळकट होत आहे.

डॉक्टरांची कमतरता ही अनेक वर्षांपासूनची समस्या होती आणि सध्याच्या सरकारने ही गंभीर त्रुटी दूर करण्यास प्राधान्य दिले याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.  2014 मध्ये देशात 387 वैद्यकीय महाविद्यालये होती . गेल्या सात वर्षांत ही संख्या 596 वैद्यकीय महाविद्यालये इतकी झाल्याचे त्यांनी सांगितले.  ही वाढ 54% आहे. 2014 मध्ये भारतात वैद्यकीय पदवी  आणि पदव्युत्तर पदवीच्या सुमारे 82 हजार जागा होत्या. गेल्या सात वर्षांत ही संख्या सुमारे 1 लाख  48 हजार जागांवर गेली आहे. ही वाढ  सुमारे 80% आहे. 2014 मध्ये देशात फक्त सात एम्स होत्या. परंतु 2014 नंतर मान्यताप्राप्त एम्सची संख्या 22 वर पोहोचली आहे. त्याचवेळी वैद्यकीय शिक्षण क्षेत्र अधिक पारदर्शक करण्यासाठी विविध सुधारणा हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तामिळनाडूमध्ये एकाच वेळी 11 वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन करून,  अलीकडेच उत्तर प्रदेशात 9 वैद्यकीय महाविद्यालयांच्या उद्घाटनाचा स्वत:चाच विक्रम मोडला, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. रामनाथपुरम आणि विरुधुनगर या दोन महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांसह निलगिरीच्या डोंगराळ जिल्ह्यात महाविद्यालये स्थापन करून प्रादेशिक असमतोल दूर केला जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

पंतप्रधान म्हणाले की,  कोविड-19 महामारीने आरोग्य क्षेत्राचे महत्व पुन्हा एकदा पटवून दिले आहे. येणारा काळ हा  आरोग्य सेवेत गुंतवणूक करणाऱ्या समाजाचा असेल.केंद्र सरकारने या क्षेत्रात अनेक सुधारणा केल्या आहेत. आयुष्मान भारतमुळे गरीबांना उच्च दर्जाची आणि परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध आहे. गुडघा प्रत्यारोपण आणि स्टेंटची किंमत पूर्वीपेक्षा एक तृतीयांश झाली आहे. 1 रुपयात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून दिल्यामुळे  महिलांमध्ये निरोगी जीवनशैलीला चालना मिळेल, अशी माहितीही त्यांनी दिली.

प्रधानमंत्री आयुष्मान भारत पायाभूत सुविधा विकास मिशनचे उद्दिष्ट आरोग्य विषयक पायाभूत सुविधा आणि आरोग्य संशोधनामध्ये विशेषतः जिल्हा स्तरावर असलेल्या  गंभीर त्रुटी दूर करणे हे  आहे. पुढील पाच वर्षांत तामिळनाडूला तीन हजार कोटींहून अधिक रुपयांची मदत दिली जाईल. यामुळे राज्यभर शहरी आरोग्य आणि कल्याण केंद्रे, जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा आणि गंभीर आजारांवरील उपचार विभागांची स्थापना करण्यात मदत होईल, असे पंतप्रधान म्हणाले. येत्या काही वर्षांत, “भारत हा दर्जेदार  आणि परवडणारी सेवा देणारा देश  बनावा असे माझे स्वप्न आहे . वैद्यकीय पर्यटनाचे केंद्र बनण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी भारतात आहेत. हे मी आपल्या डॉक्टरांच्या कौशल्याच्या आधारे म्हणतो आहे ,” असे त्यांनी सांगितले.  त्यांनी वैद्यकीय समुदायाला  टेलीमेडिसिनकडेही लक्ष देण्याचे आवाहन केले.

तमिळ भाषा आणि संस्कृतीच्या समृद्धीची आपल्याला नेहमीच भुरळ पडते, असे पंतप्रधान म्हणाले. ” जेव्हा मला जगातील सर्वात जुनी भाषा, तामिळ मधील काही शब्द  बोलण्याची संधी  संयुक्त राष्ट्रांमध्ये  मिळाली, हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता”,अशा भावना त्यांनी प्रकट केल्या. ते म्हणाले की, बनारस हिंदू विद्यापीठात तमिळ अभ्यासावर ‘सुब्रमण्य भारती अध्यासन ‘ स्थापन करण्याचा मानही त्यांच्या सरकारला मिळाला आहे. त्यांच्या लोकसभा मतदारसंघात असलेले हे अध्यासन तमिळबद्दल अधिक कुतूहल  निर्माण करेल, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये भारतीय भाषा आणि भारतीय ज्ञान प्रणालींच्या संवर्धनावर भर दिल्यासंदर्भात  भाष्य करताना,पंतप्रधान म्हणाले की, शालेय शिक्षणात माध्यमिक किंवा मध्यम स्तरावर तमिळ भाषेचा अभ्यास आता अभिजात  भाषा म्हणून करता येईल. शालेय विद्यार्थ्यांना ज्या ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून  विविध भारतीय भाषांमधील 100 वाक्ये परिचित होतात, त्या भाषा-संगममधील एक भाषा ही तमिळ आहे. भारतवाणी प्रकल्पांतर्गत तमिळ भाषेतील सर्वात मोठी ई-सामग्री डिजिटल करण्यात आली आहे. “आम्ही शाळांमध्ये मातृभाषा आणि स्थानिक भाषांमध्ये शिक्षणाला प्रोत्साहन देत आहोत. आमच्या सरकारने  विद्यार्थ्यांना भारतीय भाषांमध्येही  अभियांत्रिकीसारखे  तांत्रिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.”, असे त्यांनी सांगितले.

‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ हा उपक्रम विविधतेतील एकतेची भावना वाढीस लावण्याचा  आणि आपल्या लोकांना जवळ आणण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा हरिद्वारमधील एका लहान मुलाला तिरुवल्लुवरची मूर्ती दिसते आणि तिची   महानता समजते तेव्हा त्याच्या कोवळ्या  मनात ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चे बीज रुजते”, यावर  त्यांनी भर  दिला.त्यांनी सर्वांना सर्व खबरदारी घेण्यास आणि कोविड प्रतिबंधासाठी योग्य वर्तन ठेवण्यास सांगून भाषणाचा समारोप केला.

नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुमारे 4000 कोटी रुपये खर्चून स्थापन करण्यात आली आहेत , त्यापैकी सुमारे 2145 कोटी रुपये केंद्र सरकारने  आणि उर्वरित निधी तामिळनाडू सरकारने दिला आहे. विरुधुनगर, नमक्कल,  द निलगिरीज , तिरुपूर, तिरुवल्लूर, नागापट्टिनम, दिंडीगुल, कल्लाकुरीची, अरियालूर, रामनाथपुरम आणि कृष्णगिरी या जिल्ह्यांमध्ये नवीन महाविद्यालये स्थापन करण्यात आली आहेत.  परवडणाऱ्या वैद्यकीय शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशाच्या सर्व भागात आरोग्य पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी पंतप्रधानांच्या सततच्या प्रयत्नांच्या अनुषंगाने, या वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना करण्यात आली आहे. ‘विद्यमान जिल्हा/रेफरल रुग्णालयाशी  संलग्न नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना’ या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत 1450 जागांची एकूण क्षमता असलेली नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केली जात आहेत. या योजनेंतर्गत, ज्या जिल्ह्यांमध्ये सरकारी किंवा खाजगी वैद्यकीय महाविद्यालय नाही अशा जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केली जातात.

चेन्नईमध्ये केंद्रीय अभिजात तमीळ संस्थेच्या (सीआयसीटी) नवीन संकुलाची  स्थापना ही भारतीय वारशाचे संरक्षण आणि जतन आणि अभिजात भाषांना प्रोत्साहन देण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. नवीन संकुल हे संपूर्णपणे केंद्र सरकारद्वारे अनुदानित आहे आणि 24 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले  आहे. केंद्रीय अभिजात तमीळ संस्था आतापर्यंत भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या  इमारतीतून कार्यरत होती, या संस्थेचे काम आता नवीन 3 मजली संकुलातून होणार आहे.  एक प्रशस्त ग्रंथालय, ई-ग्रंथालय , सेमिनार हॉल आणि मल्टीमीडिया हॉलने सुसज्ज आहे.

तामिळ भाषेचे प्राचीनत्व आणि वेगळेपणा स्थापित करण्यासाठी संशोधन कार्ये करून अभिजात तमिळच्या संवर्धनासाठी, केंद्रीय अभिजात तमीळ संस्थाही  केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली स्वायत्त संस्था  योगदान देत आहे. संस्थेच्या ग्रंथालयात 45,000 हून अधिक प्राचीन तमिळ पुस्तकांचा समृद्ध संग्रह आहे. अभिजात  तमिळला प्रोत्साहन देण्यासाठी आणि या भाषेच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी ही संस्था, चर्चासत्र आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे, फेलोशिप देणे इत्यादी शैक्षणिक उपक्रम राबवते. विविध भारतीय तसेच 100 परदेशी भाषांमध्ये ‘थिरुक्कुरल’ चे भाषांतर आणि प्रकाशन करण्याचेही या संस्थेचे उद्दिष्ट आहे. हे नवीन संकुल  जगभरात अभिजात  तमिळ भाषेचा प्रचार करण्याच्या उद्देशाने संस्थेसाठी कार्यक्षम वातावरण प्रदान करेल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...