मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाहतूक पोलिसांना सूचना
पुणे-आगामी काळ हा उत्सवांचा आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे, त्यामुळे पुणे शहरातील वाहतुकीचे योग्य नियोजन करा, अशी सूचना मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी वाहतूक पोलिसांना केली. तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन मार्गे वाहतूक वाळवण्यावर कुलगुरुंशी चर्चा करून मार्ग काढू, अशी ग्वाही दिली.
पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने आज मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन सविस्तर आढावा घेतला. या बैठकीला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, आ. भीमराव तापकीर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पुणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, पीएमआरडीएचे विवेक खरवडकर, माजी मनपा गटनेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्या सह पुण्यातील सर्व प्रमुख पोलीस अधिकारी, महापालिका आणि पीएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते.
पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यात काही अडथळे असल्याचे आयुक्तांनी अमिताभ गुप्ता यांनी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. यात प्रामुख्याने मेट्रोच्या कामामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. तसेच लहान रस्ते असलेल्या भागातून पीएमटीच्या मोठ्या बसने वाहतूक करण्याऐवजी सदर मार्गांवर मिनी बसेसची संख्या वाढवावी, असे सुचवले. त्याचबरोबर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे नियोजन करताना मनुष्यबळाच्या कमतरतेचा मुद्दा अधोरेखित केला.
त्यावर मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी खासगी तत्वावरील वॉर्डनची संख्या वाढवावी, तसेच गणेशोत्सव काळात वाहतुकीच्या नियोजनासाठी एनसीसी, स्वयंसेवी संस्था यांची मदत घ्यावी, आदी सूचना यावेळी केल्या.
विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्नही यावेळी या बैठकीत चर्चिला गेला. सदर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन मार्गे वाहतूक वळविण्याचा उपाय यावेळी अधिकाऱ्यांनी सुचवला. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाची मान्यता आवश्यक असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यावर मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कुलगुरुंशी बोलून हा प्रश्न मार्गी काढू असे सांगितले.