पुणे-
महामार्गापासून ५०० मीटर पर्यंत च्या दारूबंदीमुळे घटलेले महसुली उत्पन्न वाढविण्यासाठी पेट्रोलवर प्रतिलिटर तीन रुपये अधिभार लावून राज्य सरकारने सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला मारला आहे. महामार्गांवरील बार बंद झाल्यामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठीच हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
राज्य सरकारतर्फे आतापर्यंत पेट्रोलवर सहा रुपये अधिभार वसूल करण्यात येत होता. आता हा अधिभार तीन रुपयांनी वाढवून नऊ रुपये झाला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात पेट्रोलच्या दरात तीन रुपयांनी वाढ झाली आहे. पुण्यात पेट्रोलचा दर आता ७८.०२ रुपये प्रतिलिटर झाला आहे. या संबंधीची अधिसूचना राज्य सरकारने शुक्रवारी सायंकाळी जारी केली. त्यामुळे शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच हा निर्णय लागू झाला.

