पुणे, दि. 24 : प्लास्टिक बंदी कायद्याची अंमलबजावणी करताना चुकीची व बेकायदेशीर कारवाई करून व्यापाऱ्यांकडून दंड वसूल केला आहे. या निषेधार्थ उद्या (सोमवार, 25 जून) शहर व उपनगरातील किरकोळ व्यापाऱ्यांनी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला आहे, अशी माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी आज दिली.
सोमवारी सकाळी 11 वाजता व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ महापालिकेेचे आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जाणार आहे. यावेळी व्यापाऱ्यांवर होत असलेल्या चुकीच्या कारवाईची माहिती त्यांना दिली जाणार आहे. महापालिकेकडून याची योग्य ती दखल घेतली जाईल अशी अपेक्षा आहे. परंतु, प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास मंगळवारपासून (26 जून) व्यापारी बेमुदत बंद पुकारतील. शहरातील कोथरुड, वारजे माळवाडी, सिंहगड रस्ता, कात्रज, बिबवेवाडी, सहकारनगर, सर्व पेठ भाग, गोखलेनगर, वडगावशेरी, चंदननगर आदी उपनगरातील व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची आज बैठक झाली. यामध्ये सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे, असेही निवंगुणे यांनी सांगितले. बैठकीस बैठकीला सचिन निवंगुणे, सारंग राडकर, नवनाथ सोमसे, अशोक साळेकर, रविंद्र सारुक, सुनील गेहलोत, नासिर अन्सारी, योगेश करवा, अमित भंडारे, विनोद बाफना, संजय डांगी, विनोद गोयल, अजित चंगेडिया, भानाराम चौधरी, महेश मुनोत, भंवरलाल मावाणी, राजेश चाहर, मोठाराम चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्लास्टिक बंदीस विरोध नाही, पण…
व्यापारी प्लास्टिक बंदीच्या विरोधात नाहीत. व्यापाऱ्यांकडून सर्व सहकार्य यासाठी होईल. परंतु, कायद्याचा बडगा दाखवित कारवाई केली जाते. किरकोळ व्यापारी हा किरकोळच आहे. त्याला 5 हजार, 10 हजार व 25 हजार दंड भरणे कदापी परवडणार नाही. कॅरीबॅगला व्यापाऱ्यांचाही विरोध आहे. पण पॅकिंगला पर्याय न देता त्यावर कारवाई कशी होऊ शकते? काही खाद्य पदार्थ पॅकिंग नाही केले तर लगेच खराब होतात. ते खाल्ल्यास आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो आणि तसे झाल्यास पुन्हा व्यापाऱ्यांनाच दोषी धरून त्याच्यावरच कारवाई होणार. ही अशी कारवाई होत राहिल्यास व्यापारी त्याचा व्यवसाय करु शकत नाही. तो बंदच करेल. राज्य सरकार व प्रशासनाने वास्तव परिस्थितीचा योग्य अभ्यास करून अंमलबजावणी करावी. चुकीचं व बेकायदेशीर वागणाऱ्याला जरुर शिक्षा करा. मात्र कायद्याचा चुकीचा वापर करुन व्यापाऱ्यांवर अन्याय करु नका. ही आमची मागणी आहे, असे निवंगुणे म्हणाले.