पुणे : मराठी भाषेचे उगमस्थान, महानुभाव पंथाचे प्रवर्तक भगवान श्री चक्रधर स्वामींचे गुरु परमेश्वर अवतार श्री गोविंदप्रभूचे कार्यस्थान, मराठीचा पहिला आद्यग्रंथ लीळाचरित्राचे निर्माण स्थळ असलेले रिध्दपूर हे सर्वार्थाने मराठी राजभाषा विद्यापीठासाठी योग्य ठिकाण ठरेल, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी व्यक्त केले.
अमरावती येथील हॉटेल ग्रॅंड मैफील येथे श्री रामनवमीनिमित्त आयोजित गीत रामायण रविवारी पहाटे संपन्न झाले. याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या अमरावती शाखेच्यावतीने हा कार्यक्रम गेल्या १२ वर्षांपासून साजरा केला जातो. यावेळी गीत रामायणाचा बहारदार कार्यक्रम ऐकण्यासाठी भक्तगण व श्रोतेमंडळी पहाटे पाच वाजल्यापासून राम जन्माचा सोहळा व सुमधूर गीतांच्या कार्यक्रमाचा आनंद घेतात.
महाकवी कालिदास यांचे रामटेक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता ग्रथांच्या निर्मितीचे ठिकाण गुरुकुंज मोझरी तसेच रुख्मिणी मातेचे माहेर कौंडण्यपूर ही सर्व ठिकाणे मराठी भाषा निर्मितीत योगदान देतात. महानुभाव पंथीयांचे श्रध्दास्थान यांच्या केंद्रस्थानी रिध्दपूर हे आहे. मराठी भाषेचे जतन व संवर्धन याच परिसरामध्ये झाले आहे. तसेच प्राचीन मराठीत हस्त लिखित ग्रथांचे रिध्दपूरला समृद्ध ग्रंथालयही आहे.
रिध्दपूर येथे आजही अनेक विद्वान महंत वास्तव्यास आहेत. देशभरातून महानुभाव पंथीय अनुयायी रिध्दपूरला येतात. महानुभाव पंथांचे सर्व वाड्मग मराठी भाषेतच आहे आणि अनुयायी मात्र हिंदी, पंजाबी, तेलगू, कन्ऩड तसेच परदेशी भाषिक सुद्धा आहेत. जगभरातून ही मंडळी रिध्दपूरला येत असतात व या निमित्ताने मराठी भाषा जगभर पोहचविण्याचे काम तेराव्या शतकापासून अव्याहतपणे सुरु आहे. हा सर्व इतिहास व वर्तमान पाहता मराठी विद्यापीठ रिध्दपूरलाच व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

