महाराष्ट्र स्टेट शुटींग चॅम्पियनशीप शॉटगन (नेमबाजी) स्पर्धा
विक्रम काकडे 10 ते 18 नोव्हेंबर दरम्यान दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार
पुणे : महाराष्ट्र स्टेट शुटींग चॅम्पियनशीप शॉटगन (नेमबाजी) स्पर्धेत पुण्याच्या विक्रम काकडे याने ट्रॅपमध्ये रौप्य तर, डबल ट्रॅपमध्ये कास्य पदक मिळविले आहे. येत्या 10 ते 18 नोव्हेंबर दरम्यान दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय शुटींग चॅम्पियनशीप शॉटगन (नेमबाजी) स्पर्धेत विक्रम काकडे खेळणार आहे.
महाराष्ट्र रायफल असोसिएशनतर्फे बालेवाडी येथे ही स्पर्धा 4 ते 6 नोव्हेंबर दरम्यान झाली. ट्रॅपमध्ये पाच राऊंडमध्ये 125 गुणांपैकी प्रणव गुप्ता याने 106 गुणांसह सुवर्ण व सिद्धार्थ पवारने कास्य पदक मिळविले. त्याला 99 गुण मिळाले. विक्रम काकडे याने 100 गुणांसह रौप्य पदकावर नाव कोरले. डबल ट्रॅपमध्ये पाच राऊंडमध्ये 150 गुणांपैकी विक्रम काकडे याने 101 गुण मिळवून कास्य पदक मिळविले. विजय जाधवर व विक्रम काकडे यांना सारखेच गुण मिळाल्याने कास्य पदकासाठी त्यांच्यात पुन्हा स्पर्धा झाली. त्यासाठी झालेल्या राऊडच्या चौथ्या राऊंडमध्ये विजय जाधवरचा नेम चुकला व विक्रम काकडे याने आघाडी घेत कास्य पदक पटकावले. यामध्ये सिद्धार्थ पवारने 113 गुणांसह सुवर्ण तर, प्रणव गुप्ताने 108 गुणांसह रौप्य पदक मिळविले.
तीन वर्षांपूर्वी झालेल्या राष्ट्रीय चॅम्पियनशीपमध्ये विक्रम काकडे खेळला होता. त्यामध्ये त्याचा चौथा क्रमांक आला होता. मात्र त्यानंतर गेली तीन वर्षे विक्रम काकडे सरावापासून दूर होता. सराव नसतानादेखील महाराष्ट्र स्टेट शुटींग चॅम्पियनशीप शॉटगन (नेमबाजी) स्पर्धेत विक्रम काकडेने रौप्य व कास्य पदकाची कमाई केली व राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला.
विजयाबद्दल बोलताना विक्रम काकडे म्हणाला की, गेली 6 वर्षे नेमबाजी करीत आहे. गगन नारंग माझा मित्र आहे. त्याच्यामुळे या खेळाची आवड निर्माण झाली आणि खेळत गेलो. आता सराव नसतानाही पदक मिळल्याने स्वत:कडून आशा वाढल्या आहेत. यापुढील काळात चांगला सराव करून चांगली कामगिरी करण्याची इच्छा आहे.

