मुंबई-काँग्रेसचे ज्येेष्ठ नेते, माजी मंत्री व भारती विद्यापीठाचे कुलपती डाॅ. पतंगराव कदम (७२) यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. मूत्रपिंडाच्या अाजारामुळे त्यांच्यावर ३ मार्चपासून लीलावती रुग्णालयात उपचार सुरू हाेते. त्यांना अमेरिकेला हलवण्याचेही प्रयत्न सुरू हाेते. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा साेनिया गांधी यांनी गुरुवारी रुग्णालयात येऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली हाेती. पतंगरावांच्या पश्चात पत्नी विजयमाला, मुलगा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, ज्येष्ठ बंधू आमदार मोहनराव कदम यांच्यासह माेठा परिवार अाहे. कदम चार वेळा आमदार म्हणून निवडून आले हाेते. शनिवारी सकाळी १० वाजता पुण्याच्या भारती विद्यापीठात पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल तर सायंकाळी सांगली जिल्ह्यातील वांगी येथील साेनहिरा कारखान्याच्या परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येतील.
वयाच्या 19 व्या वर्षी भारती विद्यापीठाची स्थापना-
– पतंगराव कदम यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील सोनसळ या गावी झाला. गावात प्राथमिक शिक्षण व कुंडलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतले.
– पुढे 1961 साली पुण्यात आले. शिक्षक म्हणून काम करताना काहीतरी वेगळं करण्याची जिद्द मनात बाळगत 1964 साली वयाच्या 19 व्या वर्षी भारती विद्यापीठाची स्थापना केली.
– यानंतर समाजकारण व राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला.
– 1964 साली वसंतदादा पाटील यांनी त्यांना एसटी महामंडळाचे सदस्य म्हणून नियुक्त केले. सोबतच त्या काळात त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम करत भारती विद्यापीठाचे रोपटे वाढवले.
– 1980 साली काँग्रेसने तिकीट नाकारले म्हणून ते अपक्ष उभा राहिले मात्र केवळ अडीचशे-तीनशे मतांनी पराभूत झाले.
– मात्र, त्यांनी हार मानली नाही. पुन्हा जोमाने काम करू लागले. अखेर तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी त्यांना 1985 च्या निवडणुकीत तिकीट दिले व ते निवडून आले. तेव्हापासून सलग सात वेळा पतंगराव कदम विधानसभेत निवडून गेले.
राजकीय करियर-
– 1985 ते 2018 (मृत्यूपर्यंत) ते भिलवडी वांगी आणि पलूस-कडेगाव या दोन विधानसभा मतदारसंघातून सलग सात वेळा आमदार म्हणून निवडून आले.
– जून 1991 ते मे 1992 – शिक्षण राज्यमंत्री
– मे 1992 ते 1995 – शिक्षणमंत्री (स्वतंत्र खाते)
– ऑक्टोबर 1999 ते ऑक्टोबर 2004 – उद्योग, व्यापार, वाणिज्य आणि संसदीय कामकाज खात्यांचे कॅबिनेट मंत्री
– नोव्हेंबर 2004 पासून पुढे – पुनर्वसन आणि मदतकार्ये या खात्यांचे मंत्री
प्रभारी अध्यक्ष – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
– डिसेंबर 2008 पासून – महसूल, पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन आणि शालेय शिक्षण मंत्री
– मार्च 2009 पासून – कॅबिनेट मंत्री, महसूल मंत्री
– नोव्हेंबर 2009 पासून- वन मंत्री
– 19 नोव्हेंबर 2010 ते 2014 – वन मंत्री, पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन
– ऑक्टोबर 2014 पासून आमदार. पतंगराव कदम यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. त्यांना दोन-तीन संधी मिळाली होती मात्र प्रत्येकी वेळी त्यांची संधी हुकली.
त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्राला धक्का बसला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण, यांच्यासह विविध मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनाची झालेली हानी भरून निघणारी नाही. पतंगराव कदम हे जवळपास पन्नास वर्षे सार्वजनिक जीवनात कार्यरत होते. त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात हडपसर येथील रयत शिक्षण संस्थेमध्ये एक शिक्षक या नात्याने केली होती. शिक्षणसंस्था निर्माण करणे हे त्यांचे स्वप्न होते आणि भारतीय विद्यापीठ या नावाने त्यांनी एक अभूतपूर्व शिक्षणसंस्था निर्माण केली. त्यात जवळपास चार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि व्यक्तिगत स्वरूपात मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,
– शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनामुळे मला तीव्र दु:ख झाले आहे. त्यांच्या निधनामुळे पक्षाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. या दु:खद प्रसंगी माझ्या संवेदन त्यांच्या कुटुंबीयांसमवेत आहेत
– राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष
पतंगराव कदम यांच्या जाणामुळे आम्ही एका अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाला मुकलो आहोत. ते ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक होते. त्यांनी राज्य सरकारमधील मंत्री म्हणून आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला होता.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
ज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. काँग्रेस पक्ष कदम कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!
अशोकराव चव्हाण (माजी मुख्यमंत्री -प्रदेशाध्यक्ष – कॉंग्रेस )
पतंगरावांसह आमचे व्यक्तिगत संबंध होते महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षापासून ते कार्यरत होते, महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात समाजकारण आणि राजकारण केले , पतंगराव कदम यांच्या अकस्मात मृत्यूने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही
रमेश बागवे (माजी गृहराज्यमंत्री,शहराध्यक्ष -कॉंग्रेस)
-डॉक्टर पतंगराव कदम ह्यांच्या मृत्युने महाराष्ट्र एका जाणकार आणि अभ्यासु, कर्तृत्ववान नेत्याला मुकला आहे. लहाणपणापासुनच जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अत्यंत सामान्य परिस्थितीतून ते मोठे झाले. शिक्षण, राजकारण आणि समाजकारण अशा सर्व क्षेत्रात ते यशस्वी झाले. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी हजारो विद्यार्थी घडविले...खा अनिल शिरोळे
पंतगरावांचा आणि माझा परिचय होता. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. अथक प्रयत्न, चिकाटी, शिक्षणाबदद्ल कमालीची ओढ, यातून त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना करीत त्यांनी शिक्षण तळागाळापर्यंत पोहचवले. मिनमिळावू, सर्वांशी संपर्क असणारे, हसतमुख असा हा नेता होता. त्यांना मी कधीही चिडलेले पाहिलेले नाही. ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या एका थोर नेत्याला आपण मुकलो आहोत. त्यांना माझी भावपूर्ण श्रध्दांजली.
दीपक मानकर (माजी उपमहापौर -पुणे )
अत्यंत दुर्दैैवी अशी घटना आज घडली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांचा शैैक्षणिक, सहकार क्षेत्रात खोल अभ्यास होता. शून्यातून विश्व कसे निर्माण करायचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पतंगराव. एक मनमोकळा, दिलदार नेता आणि आमचे ज्येष्ठ सहकारी गमावल्याने काँग्रेसचे फार मोठे नुकसान झाले आहे.
– हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री
पतंगराव कदम यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणातील एक ज्येष्ठ , उमदे, दिलखुलास व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. राज्याच्या राजकारणाला , समाजकारणाला, सहकार व शैक्षणीक क्षेत्राला वेगळी ओळख करून देण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. कधी काळी 2 खोल्यात सुरु झालेले भारती विद्यापीठ आणि आजचा त्याचा झालेला वटवृक्ष त्यांच्या कार्याची ओळख करून देते. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली
– धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते विधान परिषद





