नवी दिल्ली–कोरोना रुग्णांसाठी होणाऱ्या ऑक्सिजनच्या टंचाईवर दिल्ली हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली. देशात कोरोनाची सुनामी आली आहे. अशात स्थानिक प्रशासन किंवा अधिकारी ऑक्सिजन पुरवठा थांबवत असेल तर त्याला फासावर लटकवायला हवे, अशा शब्दांत हायकोर्टाने राज्य आणि केंद्र सरकारसह स्थानिक प्रशासनाला सुनावले आहे.. IIT दिल्लीच्या माहितीप्रमाणे, मे च्या दुसऱ्या आठवड्यानंतर कोरोना कळस गाठणार आहे. ही तर सुनामी आहे. तसे झाल्यास सरकारने काय तयारी केली आहे? असा सवाल कोर्टाने विचारला.
न्यायाधीश विपीन सांघी आणि रेखा पल्ली यांच्या खंडपीठाने महाजन अग्रसेन रुग्णालयाच्या अर्जावर शनिवारी सुनावणी घेतली. त्यामध्येच न्यायालयाने अशा कठोर शब्दांचा वापर केला. रुग्णालयाने किमान गंभीर रुग्णांना ऑक्सिजन मिळावे या मागणीसाठी हायकोर्टात विनंती अर्ज दाखल केला होता.दिल्ली हायकोर्टाने सांगितले, की ऑक्सिजनचा पुरवठा रोखल्याची ही घटना दाखवावी, आम्ही त्यांना फासावर लटकवू. आम्ही कुणालाही सोडणार नाही. दिल्लीतील स्थानिक प्रशासनाबाबत केंद्र सरकारला सांगा, जेणेकरून अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकेल.हायकोर्टाने यावेळी केंद्र सरकारला देखील ऑक्सिजन पुरवठ्यावर जाब विचारला आहे. दिल्लीला दर रोज 480 मेट्रिक टन ऑक्सिजन देण्याचा निर्णय अमलात कधी येईल? 21 एप्रिल रोजीच आपण हे आश्वासन दिले होते. विशेष म्हणजे, दिल्ली सरकारला आश्वासने देऊन सुद्धा केंद्राकडून रोज केवळ 380 मेट्रिक टन ऑक्सिजन मिळत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यात शुक्रवारी केवळ 300 मेट्रिक टन ऑक्सिजन मिळाले. सध्याची परिस्थिती पाहता गरज पडल्यास रुग्णालयांना संरक्षण द्या. कारण, प्रिय व्यक्ती गमावल्यानंतर लोकांच्या काय भावना असतात याची कोर्टाला जाणीव आहे असे खंडपीठाने म्हटले आहे.

