ओतुर – संजोक काळदंते)
विविध सुविधांपासून आणि पुरातत्व खात्यापासून दुर्लक्षित असलेला मात्र शिवाजी ट्रेल व दुर्गप्रेमी निसर्गमित्र ग्रुप च्या माध्यमातून कायापालट होऊन पर्यटकांना माहीत होतं असलेल्या किल्ले नारायणगडावर दुर्गप्रेमी कडून मशाल,दिवट्या,पणत्या पेटवून दीपोत्सव साजरा करण्यात आला.
दुगप्रेमी निसर्ग मित्र ग्रुप ,शिवाजी ट्रेल, सह्याद्री प्रतिष्ठान यांचे वतीने नारायणगडावर संवर्धनाचे कार्य सुरू आहे. यामध्ये हिवरे, गडाची वाडी खोडद परिसरातील तरुणांचा सहभाग महत्वाचा आहे. जेव्हापासून दुर्गसंवर्धनाचे कार्य ग्रुप च्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे, तेव्हापासून किल्ले नारायणगडावर प्रत्येक दिवाळीत दीपोत्सव करण्यात येतो. यावेळेसचे हे चौथे वर्ष असून अनेक दुर्गप्रेमी यावेळी उपस्थित होते.
नारायणगड दुर्ग संवर्धन समितीचे अध्यक्ष शिवदास खोकराळे यावेळी म्हणाले की,गडकोट ,दुर्ग हे आपले खरे वैभव आहे त्यांचे जतन करणे गरजेचे आहे. आसपासच्या तरुणांच्या माध्यमातून खरा नारायणगडाचा विकास होत आहे , नाहीतर हा किल्ला दुर्लक्षितच होता. आता मात्र पर्यटकांची संख्या सध्या वाढत आहे. नारायणगडावर खूप जैविक संपदा आहे, दुर्मिळ वनस्पती, प्राणी , पक्षी या परिसरात आहेत, पर्यटकांनी संवैधानिक आचारसंहीतेत राहिल्यास निसर्गाची हानी होणार नाही. दुर्लक्षित नारायणगड राज्याच्या काना कोपऱ्यात नेण्याचे कार्य पत्रकार बंधूनी केले आहे. दिवाळीत घरे प्रकाशाने तेजस्वी होतात मात्र आपले वैभव असणारे किल्ले अंधारातच असतात. त्यामुळे गडावर दीपोत्सव करणारे शिवाजी ट्रेल व दुर्गप्रेमी निसर्गमित्र ग्रुप या मोहिमेचा उद्गाता आहे.
यावेळी खोडदचे सरपंच विश्वास काळे, नारायणगड दुर्गसंवर्धन समितीचे अध्यक्ष शिवदास खोकराळे, शिवाजी ट्रेलचे संचालक सचिन तोडकर, रवी वामन, भालचंद्र वामन, संजय रणदिवे, अशोक खरात, तुषार आंधळे, दत्ता वामन, राहुल वामन, कैलास काळे, सुरेश काळे, गोरख खिलारी, सचिन आत्रे, निखिल डोंगरे, अभिजित खैरे, राजू भोर, रंगनाथ कुंडलिक, तुषार रणदिवे, निलम खोकराळे, वंदना शिंदे, नंदाताई खोकराळे, सायली आंधळे, पल्लवी काशिकेदार, केतन साळवे, कदील पठाण आदी उपस्थित होते.



