शेतकरी, मच्छिमार, प्रकल्पग्रस्तांचा संवाद मेळावा संपन्न
अलिबाग दि. १७ ऑगस्ट – राज्य सरकारला भस्म्या रोग झाला आहे. गोरगरिबांना दाबून त्यांच्या प्रकल्पासाठी जागा घ्यायच्या, जमिनीचा मोबदला आपल्या खिशात टाकायचा आणि दुसऱ्यांवर बोटे दाखवत राजकारण करायचे, हे भाजप चालू देणार नाही. तुमच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी तुमच्या मातीतला माणूस आज केंद्रात मंत्री म्हणून आहे. त्यामुळे जोपर्यंत लोकांची इच्छा नाही, तोपर्यंत जमिनीचा एक तुकडाही विकू देणार नाही, असा इशारा विधान परिषद विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर यांनी अलिबाग येथे बोलताना दिला.
जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेला मंगळवारी अलिबागमध्ये प्रारंभ झाला. आज सकाळी भाजपकडून भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये शेतकरी, मच्छिमार, प्रकल्पग्रस्त बांधव यांच्यासोबत संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी यावेळी राज्य सरकारवर चांगलाच निशाणा साधला. यावेळी बोलताना दरेकर म्हणाले, आपली जमीन आपली आहे, कोणीही आपल्यावर जबरदस्ती करू शकत नाही. दुसऱ्यांनी आपली जमीन घ्यायची व त्याचा मोबदला तो खिशात घालणार असेल तर भाजप कोणत्याही परिस्थितीत हे सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी बोलताना दरेकर पुढे म्हणाले, जागा आमची, जमीन आमची, केंद्रामध्ये सरकार आमचे आणि जो प्रकल्प मंजूर झाला नाही तो प्रकल्प येणार म्हणून प्रकल्पग्रस्तांची जमीन घेतली जात आहे. त्यामुळे ज्या प्रकल्पासाठी जमीन खरेदी केली जात आहे तो प्रकल्प या जागेत येणार नाही याची काळजी आपण केंद्रीय मंत्री म्हणून घ्यावी, अशी विनंती दरेकर यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना केली. ते पुढे म्हणाले, या ठिकाणी मच्छिमार, कोळी समाज आहे, बागायतदार आहे. कुठल्याही प्रकारचा विचार न करता ‘आली लहर म्हणून केला कहर’ या प्रकारे राज्य सरकार जमीन हिसकावू शकत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया दरेकर यांनी यावेळी दिली.
दरेकर म्हणाले, आतापर्यंत अशा कितीतरी गोरगरिबांच्या जागा राज्य सरकारने घेतल्या असून आज ३० वर्षे झाली तरी प्रकल्पाची बीजे रायगड जिल्ह्यात रोवली गेली नाहीत. राज्य सरकार गोरगरिबांची लाख-दोन लाख रुपयांची जागा २०-३० लाख रुपयाला विकत असून जिल्ह्यात अजूनही प्रकल्प झाला नाही. हे भाजप अजिबात चालू देणार नाही. याच्यावर लगाम लागला पाहिजे. भाजप ताकदीने प्रकल्पग्रस्ताच्या मागे उभा आहे. विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या सभेत विरोधी पक्षनेता म्हणून मी आणि विधानसभेच्या सभागृहात विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीस आपल्या हक्कासाठी, आपल्या न्यायासाठी नक्कीच लढतील, असा विश्वास दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे आमदार गणपतशेठ गायकवाड, आमदार रमेश पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत पाटील, जिल्हा अध्यक्ष महेश मोहिते यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
जोपर्यंत लोकांची इच्छा नाही, तोपर्यंत जमिनीचा एक तुकडाही विकू देणार नाही-विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा इशारा
Date:

