पुणे, दि. 15 मे 2021: गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटातही महावितरणच्या पुणे परिमंडलाने उल्लेखनीय कामगिरी करीत घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील तब्बल 1 लाख 49 हजार 783 नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत. यामध्ये 1 लाख 9 हजार 019 नवीन वीजजोडण्या मार्च अखेरपर्यंत तर विशेष म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संचारबंदी सुरु असताना दि. 1 एप्रिल ते 15 मे या दीड महिन्यात तब्बल 40 हजार 764 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.
मागील वर्षी मार्चमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे जूनपर्यंत लॉकडाऊन असल्याने नवीन वीजजोडण्यांचा वेग मंदावला होता. त्यानंतर पुणे परिमंडलामध्ये नवीन वीजजोडण्या देण्याच्या कार्यवाहीला वेग देण्यात आला. गेल्या आर्थिक वर्षात पुणे शहरात 41425 घरगुती, 6253 वाणिज्यिक, 643 औद्योगिक व 309 इतर अशा एकूण 48 हजार 630 नवीन वीजजोडण्यात देण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 24381 घरगुती, 3229 वाणिज्यिक, 762 औद्योगिक व 160 इतर अशा एकूण 28 हजार 532 आणि मुळशी, वेल्हे, हवेली (ग्रामीण), मावळ, राजगुरुनगर, आंबेगाव, जुन्नर तालुक्यामध्ये 27600 घरगुती, 3074 वाणिज्यिक, 802 औद्योगिक व 381 इतर अशा एकूण 31 हजार 857 नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
गेल्या एप्रिलपासून कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या संचारबंदी सुरु आहे. या आपत्कालीन परिस्थितीमध्ये एकीकडे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र राबत असलेल्या महावितरणने दि. 1 एप्रिल ते 15 मेपर्यंत संचारबंदीच्या खडतर काळात ग्राहकसेवेचे कर्तव्य चोखपणे बजावत तब्बल 40 हजार 764 नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत. या दीड महिन्याच्या कालावधीत पुणे शहरात 16425 घरगुती, 2221 वाणिज्यिक, 113 औद्योगिक व 78 इतर अशा 18 हजार 837 नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरात 7738 घरगुती, 1206 वाणिज्यिक, 222 औद्योगिक व 47 इतर अशा 9213 आणि मुळशी, वेल्हे, हवेली (ग्रामीण), मावळ, राजगुरुनगर, आंबेगाव, जुन्नर तालुक्यामध्ये 11092 घरगुती, 1318 वाणिज्यिक, 167 औद्योगिक व 137 इतर अशा एकूण 12 हजार 714 नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
यासोबतच पुणे परिमंडलातील सर्व अभियंता व कर्मचारी कोविड रुग्णालये, विलगीकरण कक्ष, ऑक्सीजन निर्मिती उद्योग व लसीकरण केद्रांना नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार देण्यासाठी युद्धपातळीवर कर्तव्य बजावत आहे. कोरोना संकटाला सामोरे जात विविध ग्राहकसेवा देताना प्रामुख्याने नवीन वीजजोडणी देण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी पुणे परिमंडलातील अभियंते व कर्मचाऱ्यांचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनी कौतुक केले आहे. ग्राहकसेवा देताना कोविड-19 च्या उपाययोजनांचे पूर्णपणे पालन करावे व आरोग्याची काळजी घेत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वाधिक प्राधान्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

