काठ्या-विटांनी हल्ला, खबऱ्याच्या खुनाचा केला प्रयत्न
पुणे- पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकावर सुमारे दीडशे जणांच्या जमावाने हल्ला केला असून यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जमावाने पोलिसांच्या खबऱ्याचा खून करण्याचा प्रयत्न देखील केला. विशेष म्हणजे या जमावात मोठ्या संख्येने महिलाही सामील होत्या. ही घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास वारज्यातील म्हाडा कॉलनीत घडली आहे. पोलीस कर्मचारी श्रीकांत दगडे (वय – 33) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार 150 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीकांत दगडे हे गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकात कार्यरत आहेत. दगडे आणि सहकारी ऋषिकेश कोळप मंगळवारी रात्री वारजे येथे पेट्रोलिंग करण्यास गेले होते. त्यावेळी वारजेतील म्हाडा कॉलनी इमारतीत राहणाऱ्या अभिजित खंडागळे नावाच्या व्यक्तीकडे गावठी पिस्तूल असून तो साथीदारासह जबरी चोरी करणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर दगडे एका मित्राला सोबत घेऊन पोलीस म्हाडा कॉलनी येथे गेले. त्यांनी सोसायटीखाली गाडी पार्क करुन चौथ्या मजल्यावरील अभिजित याच्या रूमचे दार वाजवले. हा दरवाजा एका महिलेने उघडला. त्यांनी महिलेला अभिजित याच्याबाबत विचारपूस करत चौकशी केली. महिलेने तो बाहेर गेला असल्याचे सांगितले. तोपर्यंत येथे मोठ्या प्रमाणात सोसायटीमधील जमाव जमला होता.
कर्मचारी दगडे यांना परिस्थिती संशयास्पद वाटल्यामुळे ते खबरीला सोबत घेऊन खाली आले. यावेळी मात्र इमारती खाली मोठ्या प्रमाणावर जमाव जमला होता. त्यातील काहींनी खबऱ्याला पाहत ‘तू आमच्याबाबत पोलिसांना माहिती देत असतो, आज तुला जिवंत सोडणार नाही’, असे म्हणत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. बांबू, विटा, सिमेंटच्या ब्लॉकने त्याला मारहाण केली. जमावाच्या हल्ल्यात त्याच्या डोक्यात जबर मार लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला.
कर्मचारी दगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जमावाला आम्ही पोलीस आहोत असे सांगूनही जमावाने ऐकले नाही. दगडे व त्यांचे सहकारी खबऱ्याला वाचवण्यामध्ये मध्ये पडले असता त्यांनाही जमावाने बेदम मारहाण केली. सर्व प्रकार घडल्यानंतर त्यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दोन दिवसानंतर तक्रार दिली गेली.
‘जमावाच्या मारहाणीत खबरी व्यक्तीला मार लागला आहे. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी जमावासोबत झटापट केली. याप्रकरणी सुमारे 125 ते 150 व्यक्तींवर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्याची कार्यवाही सुरु आहे.’ असे श्रीनिवास घाडगे, पोलीस उपायुक्त यांनी सांगितले

