मुंबई – राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कोणत्याही संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणलेली नाही.तसेच, त्यासंदर्भातील कोणतीही नोटीस अजित पवार यांना प्राप्त झालेली नाही. प्रसिद्धी माध्यमात याबाबत येत असलेले वृत्त निराधार, वस्तुस्थितीशी विसंगत, खोडसाळपणाचे आहे, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. आयकर विभागाने अजित पवार यांच्याशी निगडीत ५ संपत्तीवर, जवळपास 1 हजार कोटींच्या संपत्तीवर जप्ती आणल्याचे वृत्त माध्यमांत झळकले होते. मात्र, अजित पवार यांच्याकडून हे वृत्त निराधार असल्याचे सांगण्यात आलंय. तसेच, कुठलिही संपत्ती जप्त करण्यात आली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आलंय.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रसारीत होत असलेल्या बातम्यांचे खंडन करताना त्यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील म्हणाले की, अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच आलेली नाही किंवा त्यासंदर्भात नोटीसही बजावण्यात आलेली नाही. आयकर विभागाकडून काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. त्या पत्राला योग्य ते उत्तर देण्यात येईल. प्रशासकीय आणि कायदेशीर मार्गाने योग्य ती कार्यवाही केली जाईल, असंही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रसिद्धीमाध्यमांनी वस्तुस्थिती तपासून बातम्या द्याव्यात व कुठलाही अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे करण्यात आले आहे.

