‘निवेदिता प्रतिष्ठान’च्या वतीने ‘साई चिल्ड्रन’ संस्थेतील अनाथ मुलांना सिंथेसायझरची अनोखी भेट !
पुणे:
निवेदिता प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने ‘बॉलिवूड धमाका’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे फेस्टिव्हलमधील स्पर्धांतर्गत घेण्यात आलेल्या ‘व्हॉईस ऑफ पुणे’ या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामुळे मुलांना आपली कला सादर करण्याकरीता उत्तम व्यासपीठ मिळाले.
तसेच याच कार्यक्रमातंर्गत ‘साई चिल्ड्रन अनाथाश्रम’ संस्थेतील अनाथ मुलांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पौर्णिमा पांडे (भातखंडे विद्यापीठाच्या माजी कुलगुरू, लखनौ), डॉ. नीता पीर यांच्या हस्ते मुलांना देणगी स्वरूपात सिंथेसायझरची अनोखी भेट देण्यात आली.
यावेळी कृष्णकांत कुदळे (पुणे फेस्टिव्हलचे समन्वयक), निवेदिता प्रतिष्ठानच्या संचालिका अॅड. अनुराधा भारती, सत्य भारती, विवेक परांजपे (प्रसिद्ध ज्येष्ठ कलाकार) उपस्थित होते.
‘निवेदिता प्रतिष्ठान’च्या वतीने दरवर्षी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांद्वारे जमा झालेल्या रक्कमेतून सामाजिक संस्थांना मदत करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. याच उपक्रमांर्गत व्हाईस ऑफ पुणे स्पर्धेतील मुलांना बॉलिवूड धमाका या कार्यक्रमामध्ये आपली कला सादर करण्यास वाव मिळाला.
‘निवेदिता प्रतिष्ठान’ ही संस्था गेली 10 वर्षे अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, महिलाश्रम यांच्याकरीता कार्यरत आहे. संस्थेच्या वतीने गरजू महिलांना रोजगार देणे, समाजातील गोर-गरीब लोकांना आर्थिक मदत करणे, मूक-बधीर मुलांच्या शाळा यांना आर्थिक मदत करणे. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळ्या कलाक्षेत्रातील सर्व वयोगटातील महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे. अशाप्रकारचे सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.