मुंबई, दि. 29 : पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. भारत निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण सुरू झाले असून, १ नोव्हेंबरपासून १ जानेवारी २०२२ रोजी १८ किंवा अधिक वय असलेल्या नागरिकांना मतदार म्हणून नाव नोंदवता येणार आहे.
1 नोव्हेंबर रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयामध्ये प्रारूप यादी प्रकाशित केली जाईल. मतदारांनी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इ. तपशील मतदार यादीत तपासून ते अचूक आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे. बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. त्यामुळे मतदारांनी प्रारूप मतदार यादीतील आपले तपशील आत्ताच तपासणे महत्त्वाचे आहे.
१ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ हा कालावधी मतदार नोंदणीचा आहे, तसा तो एखाद्याच्या नावासंबंधी हरकती घेण्याचाही आहे. एखाद्या मतदारसंघातील एखादा मतदार यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल, तर अशा नावाबद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणेही महत्त्वाचे असते.
यंदाच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहकार्याने राज्यभर मतदार नोंदणीची मोहीम राबवणार आहे. तसेच, तृतीय पंथी नागरिक, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, दिव्यांग व्यक्ती यांच्या नाव नोंदणीसाठी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने मोहीम राबवली जाणार आहे. मतदार नोंदणीसाठी नोव्हेंबरमधील १३-१४ आणि २७-२८ तारखांना राज्यभर विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच, ग्राम विकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने १६ नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. या दिवशी राज्यभरातील ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्यांतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या स्त्रिया, गावात कायमस्वरूपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल. तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावांची मतदार यादीतून वगळणी केली जाईल.
येत्या काळात अनेक महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदा, पंचायत समित्या यांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आणि नगरपालिका येथे प्रभागानुसार मतदार अर्ज स्वीकृती केंद्रे उभारली जाणार आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी नव्याने मतदार म्हणून पात्र प्रत्येक युवकांने मतदार यादीत आपले नाव नोंदवावे, तसेच प्रत्येक मतदाराने प्रारूप मतदार यादीतील आपला तपशील अचूक आहेत का याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.
मतदारांमध्ये निवडणूक, लोकशाही यांविषयीची जाणीव-जागृती निर्माण व्हावी म्हणून भारत निवडणूक आयोगाने ‘मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणुकीतील सहभाग’ (Systematic Voters’ Education and Electoral Participation- SVEEP) हा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्याक्रमांतर्गत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळे स्थापन करण्यासाठी परिपत्रके काढलेली आहेत. आज शाळा-महाविद्यालयांमधून शिकणारे विद्यार्थी सुजाण नागरिक झाले तरच देशात लोकशाही साक्षरता निर्माण होईल, हा विचार हे व्यासपीठ स्थापन करण्यामागे आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकशाही मूल्यांची रुजवण आणि शिक्षकांची भूमिका’ हा कार्यक्रम आणि ‘लोकशाही गप्पा (भाग-एक)’ हे कार्यक्रम घेण्यात आले होते. या ‘लोकशाही गप्पां’मध्ये डॉ. सुहास पळशीकर, प्रवीण महाजन, श्रीरंग गोडबोले, नागराज मंजुळे, रवींद्र धनक, श्रुती गणेश हे मान्यवर सहभागी झाले होते.
स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदारांमध्ये निवडणूक, लोकशाही यांविषयीची जाणीव-जागृती निर्माण करण्यासाठी यंदा घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा (उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा), लोकशाही भोंडला या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सध्या लोकशाही दीपावली ही स्पर्धा सुरू आहे.