मुंबई: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला आहे.सक्तवसुली संचलनालयाने संजय राऊत यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक केली. यानंतर ५ सप्टेंबर रोजी संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राऊत आता १९ सप्टेंबरपर्यंत कोठडीमध्येच असणार आहेत. यातच जामीन मिळण्यासाठी संजय राऊत यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज केल्याची माहिती देण्यात आली आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या जामीन अर्जावर उद्याच म्हणजे गुरुवारी सुनावणी होऊ शकते, असा कयास बांधला जात आहे. ईडीने अटक केल्यानंतर सुरुवातीला ईडी कोठडी सुनावल्यानंतर विशेष न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावत संजय राऊतांची आर्थर रोड तुरुंगात रवानगी केली. यानंतर संजय राऊत यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली. संजय राऊत यांनी केलेल्या जामीन अर्जावर न्यायालय काय निर्णय देणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल्याचे सांगितले जात आहे.