मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री शशिकला यांचे आज दुपारी वयाच्या 88 व्या वर्षी मुंबईतील कुलाबा येथील घरी निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. शशिकला यांनी ओम प्रकाश सैगल यांच्यासोबत प्रेम विवाह केला होता. त्यांना दोन मुली आहेत.
शशिकला जवळकर यांचा जन्म सोलापुरमध्ये 1932 मध्ये झाला होता.शशिकला यांच्या वडिलांचं उद्योगात मोठं नुकसान झाल्याने त्यांचं संपूर्ण कुटूंब काम शोधण्यासाठी मुंबईत आलं. याचवेळी त्यांची भेट लोकप्रिय गायिका-नूरजहाँ यांच्याशी झाली. नूरजहाँचे पतीच दिग्दर्शित करीत असलेल्या ‘झिनत’ या चित्रपटात कव्वालीच्या सीनमध्ये शशिकला यांना संधी मिळाली. त्यानंतर व्ही. शांताराम यांच्या ‘तीन बत्ती चार रास्तामध्ये’ त्यांनी एक भूमिका साकारली.जागा भाड्याने देणे आहे, पठ्ठे बाबुराव, चाळीतील शेजारी, येरे माझ्या मागल्या, झालं गेलं विसरून जा, यंदा कर्तव्य आहे, सलामी, महानंदा, लेक चालली सासरला, धाकटी सून या मराठी चित्रपटात भूमिका साकारली आहे…
आरती, गूमराह, फूल और पत्थर यासारख्या सिनेमांमध्ये त्यांनी साकारलेल्या खलनायिकेच्या भूमिका चांगल्याचं गाजल्या. यानंतर त्यांना खलनायिकेच्या भूमिका अधिक मिळू लागल्या.शशिकला यांनी ‘सुजाता’, ‘आरती’, ‘अनुपमा’, ‘पत्थर और फूल’, ‘आई मिलन की बेला’, ‘गुमराह’, ‘वक्त’, ‘खूबसूरत’, ‘छोटे सरकार’, अशा शेकडो चित्रपटांमध्ये काम केले आहे. उत्तम सहायत अभिनेत्री म्हणून शशिकला यांनी चित्रपटांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. आरती आणि गुमराह सिनेमातील भूमिकांसाठी तर त्यांना ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाला होता. तर 2007 साली सिनेसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.आपल्या चित्रपट कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षांत, शशिकला यांनी करण जोहरच्या मल्टीस्टारर चित्रपट कभी खुशी कभी गम या चित्रपटात विशेष भूमिका साकारली होती. याशिवाय त्यांनी ‘बादशाह’, ‘चोरी चोरी’, ‘परदेस’ या चित्रपटांतही काम केले. चित्रपटांव्यतिरिक्त शशिकला अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये आई आणि सासूच्या भूमिकेतही दिसल्या आहेत.
अभिनेत्री शशिकला यांचा अल्पपरिचय.
जन्म. ४ ऑगस्ट १९३२ सोलापुर येथे.
शशिकला यांचे सिनेसृष्टीत योगदान मोठे होते. विशेष म्हणजे प्रमुख अभिनेत्री म्हणून काम करता करता त्यांनी खलनायिका म्हणून वेगळीच छाप पाडली. शशिकला यांचे पूर्ण नाव शशिकला जावळकर. पूर्ण मराठी अभिनेत्री. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच शशिकला नृत्य, गायन व अभिनय करू लागल्या. वडिलांचे दिवाळे निघाल्यामुळे हे कुटुंब सोलापूर सोडून उदरनिर्वाहासाठी मुंबईस आले. त्यावेळेस शशीकला ७ ते ८ वर्षांच्या होत्या. तेथे त्यांची नूरजहाँसोबत गाठ पडली व शशिकला यांना नूरजहाँने परखले. त्यामुळे त्यांना ‘झीनत’या शौकत रिझवी (नूरजहाँचे पती) यांच्या चित्रपटात काम मिळाले. त्यांच्या ‘जुगनू’ व इतर ३-४ चित्रपटात ४०० रुपये महिन्याने कामे केली. नंतर शशिकला यांच्याकडे निर्माते, पी. एन. अरोरा, अमिया चक्रवर्ती व व्ही. शांताराम यांचे लक्ष गेले. १९५३ साली शांताराम यांनी त्यांना‘तीन बत्ती चार रास्ता’ या चित्रपटात काम दिले. वयाच्या विसाव्या वर्षी के. एल. सहगल कुटुंबातील ओमप्रकाश सहगल यांच्या बरोबर शशिकला यांचा विवाह झाला. १९५९ सालापासून त्यांनी निगेटिाव्ह रोल स्वीकारणे सुरू केले. १९५९ साली आलेल्या बिमल रॉय यांच्या ‘सुजाता’ या चित्रपटात त्यांनी नायिका नूतन यांच्या बरोबरीने काम केले व स्वतःची वेगळी इमेज बनवली. १९६२ साली ताराचंद बडजात्या यांच्या ‘आरती’ या नावाजलेल्या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना बेस्ट स्पोर्टिंग अॅक्ट्रेसचा ‘फिल्म फेअर अवार्ड’मिळाला. तसेच १९६३ साली बी. आर. चोप्राच्या ‘गुमराह’ चित्रपटातील खल भूमिकेसाठी त्यांना ‘फिल्म फेअर अवार्ड’ मिळाला. शशिकला यांची संवाद फेकण्याची लकब व साजेसा अभिनय (भृकुटी व नेत्रांनी) या गुणांमुळे त्यांच्या निगेटिव्ह भूमिकाही उच्च अभिनिेत असत. एकापेक्षा एक नावाजलेल्या व श्रेष्ठ निर्मात्यांकडे त्यांनी १०० पेक्षा अधिक चित्रपटात भूमिका केल्या. यात ‘नौ दो ग्यारह’,‘कानुन’,‘जंगली’,‘हरियाली और रास्ता’,‘अनपढ’,‘यह रास्ते हैं प्यार के’,‘वक्त’,‘देवर’,‘अनुपमा’,‘नीलकमल’,‘तीन बहुरानियाँ’,‘हमजोली’,‘सरगम’,‘क्रांती’,‘रॉकी’,‘बादशहा’,‘कभी खुशी कभी गम’, ‘चोरी चोरी’ इत्यादी समावेश आहे. चित्रपटात देखणे रूप, नृत्यात पारंगत व उत्कृष्ट अभिनय पात्रता असल्यावर नायिकेचा रोल मिळत असला, तरी त्यांना नाईकेच रोल मिळाला नाही. हे शल्य कायम त्यांच्या मनात होते. २००७ साली भारत सरकारने त्यांच्या चित्रपट सृष्टीतील योगदानासाठी ‘पद्मश्री’किताबाने गौरविले होते, तसेच २००९ साली व्ही. शांताराम लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्डही त्यांना प्राप्त झाला होता. तसेच राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे शशिकला यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार पण मिळाला होता. गेले अनेक वर्षांपासून शशिकला ही मदर टेरेसा यांच्या इगतपुरी येथील हॉस्पिटल मध्ये रुग्णसेवेत व मनःशांतीत आयुष्य व्यतीत करीत होत्या.