मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाचा चौथा बळी गेला आहे. आज मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात 65 वर्षीय कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता अशी माहिती आहे. यासोबत यापूर्वी मुंबईतच 3 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला होता.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. आज राज्यातील कोरोनाग्रस्तांनी शंभरी पार केली आहे. पुण्यात 3 तर साताऱ्यात आणखी एक कोरोना रुग्ण आढळला आहे. यासोबतच राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 101 वर पोहोचली आहे. कोरोनाचा आकडा मर्यादित ठेवण्यासाठी संचारबंदीचे पालन करण्याची आवश्यकता आहे.
गेल्या बारा तासात महाराष्ट्रात कोरोनाचे चार रुग्ण सापडले आहेत. पुण्यातील तीन जणांचे कोरोना रिपोर्ट आज सकाळी पॉझिटिव्ह आले. दोन रुग्ण खाजगी हॉस्पिटलमध्ये आहेत, तर एक रुग्ण नायडू रुग्णालयात उपचार घेत आहे. पुणे शहरातील एकूण रुग्णांचा आकडा 19 वर पोहोचला आहे. साताऱ्यात काल रात्री एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. कॅलिफोर्नियाहून प्रवास करुन आलेली 63 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित झाली आहे. साताऱ्यात एका दिवसात दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.