मुंबई/नाशिक – मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपमहापौरपदी सुहास वाडकर यांची निवड करण्यात आली. महापौर पदाच्या शर्यतीत पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, सोमवारी सायंकाळी शेवटच्या क्षणी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता.
मुंबईतील खड्डय़ांचे प्रश्न किंवा विविध कारणांमुळे पक्षावर होणारी टीका, प्रत्येक वेळी तडफेने प्रत्युत्तर देणाऱ्या ज्येष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना पक्षनेतृत्वाशी एकनिष्ठ राहण्याचे बक्षीस मिळाल्याच्या चर्चा रंगत आहेत.
परिचारिका ते महापौर
किशोरी पेडणेकर यांचा जन्म एका गिरणी कामगाराच्या घरात झाला होता. विवाहानंतर न्हावाशेवा इथल्या रुग्णालयात त्या परिचारीका म्हणून सुरुवातीला काम करत होत्या. महापालिका रुग्णालयामध्ये परिचारिका म्हणून सेवेत असणार्या पेडणेकर यांनी या सेवेचा राजीनामा देत 2002 मध्ये महापालिका निवडणूक लढवली होती. नंतर 2007 मध्ये आरक्षणामुळे त्यांना संधी मिळाली नाही. परंतु 2012 आणि 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सलग दोनदा त्या निवडून आल्या. पेडणेकर यांची नगरसेविका पदाची ही तिसरी वेळ आहे. स्थायी समिती, महिला बाल कल्याण समिती, सुधार समिती या समित्यांवरील कामाचा त्यांना अनुभव आहे. पक्षाने त्यांच्यावर महिला विभाग संघटकाची जबाबदारी सोपवली होती.
विधानसभा निवणुकीच्या वेळी आदित्य ठाकरे यांच्या प्रचारासाठी त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. आक्रमक आणि निष्ठावान नगरसेवक म्हणून महापालिकेत त्यांची एक वेगळी ओळख आहे. म्हणून महापौर पद महिलेसाठी आरक्षित नसतानाही किशोरी यांच्या नावाची घोषणा पक्षाने केली.
नाशकात मनसेच्या साथीने भाजपचा महापौर
तर दूसरीकडे नाशिक महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाचही नगरसेवकांनी भाजपला साथ दिली. त्याच प्रमाणे भाजपच्या दहाही नगरसेवकांनी बंडखोरी मागे घेऊन भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपचा विजयाचा मार्ग सुकर झाला.