पुणे-अनिल भोसले आणि रेश्मा भोसले यांचे निवडणुकीतील उमेदवारीबाबत चे दलबदलू कृत्य म्हणजे गद्दारी शब्दाला देखील लाज आणणारे असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला . ते पुण्यातील प्रचारसभेदरम्यान पत्रकारांशी बोलत होते.नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत भोसरीचे माजी आमदार विलास लांडे आणि माजी महापौर आझम पानसरे यांना टाळून अनिल भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी देण्यात आली होती, असे असतानाही अनिल भोसले यांच्या पत्नीने केलेली बंडखोरी म्हणजे गद्दार शब्दाला लाजवणारे कृत्य असल्याचे ते म्हणाले. पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी रेश्मा भोसले यांना राष्ट्रवादीने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी भाजपकडून प्रभाग क्रमांक ७ ओपन गटामधून अर्ज दाखल केला होता. त्यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी भोसलेंचे व्याही खासदार संजय काकडे यांनी विशेष प्रयत्न केल्याची चर्चा आहे. त्यांना राष्ट्रवादीतून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर पुणे विद्यापीठ येथील अजित पवार यांच्या निवासस्थाना बाहेर अनिल भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा बाजी देखील केली होती. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशामुळे मोठी राजकीय खळबळ उडाली . यंदा झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यामधून अनेक दिग्गज राष्ट्रवादीचे नेते इच्छुक होते. मात्र, अजित पवार यांनी पुन्हा अनिल भोसले यांच्यावर विश्वास दाखवीत विधान परिषदेची उमेदवारी देत त्यांना विक्रमी मतांनी निवडून आणले. अनिल भोसले यांनी गद्दारी करण्याचे काहीच कारण नव्हते. गद्दार या शब्दालाही असे वाटेल की, मला गद्दार हा शब्द लावू नका, इतक्या विचित्र पद्धतीने हा प्रकार घडला आहे. त्यांच्याशी माझे बोलणे झाले नाही. अनिल भोसले यांना पक्षाकडून नोटीस दिली जाणार, त्यानंतर निर्णय होईल.
गद्दार शब्दालाही लाजवेल अशी गद्दारी भोसलेंनी केली – अजितदादा
Date:

