पुणे :
खाजगी वाहनांचा वापर कमी करून कार्बन फूटप्रिंटचे प्रमाण कमी करावे : खासदार वंदना चव्हाण
‘ खाजगी वाहनांचा वापर कमी करून कार्बन फूटप्रिंटचे प्रमाण कमी करावे’, असे प्रतिपादन खासदार वंदना चव्हाण यांनी केले . इन्स्टिटयूट ऑफ इंडियन इंटिरियर डिझायनर्स ,पुणे रिजिनल चॅप्टर, असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझे शहर माझे वचन’ या विषयावर १२ जानेवारी रोजी ईशान्य मॉल ,एअरपोर्ट रोड येथे आयोजीत चर्चासत्रात त्या बोलत होत्या.
या चर्चसत्रात खासदार ऍड. वंदना चव्हाण , मराठा चेम्बर्स ऑफ कॉमर्सचे संचालक अनंत सरदेशमुख, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर , नॅशनल सोसायटीज फॉर क्लीन सिटीज,पुणेचे प्रतिनिधी सतीश खोत , श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे खजिनदार महेश सूर्यवंशी सहभागी झाले होते. इन्स्टिटयूट ऑफ इंडियन इंटिरियर डिझायनर्स ,पुणे रिजिनल चॅप्टरचे विष्णू भेडा आणि प्रताप जाधव यांनी चर्चासत्रात मान्यवरांशी संवाद साधला.
या चर्चासत्रात बोलताना खासदार ऍड. वंदना चव्हाण , पुढे म्हणाल्या , ‘सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट झाली पाहिजे . पदपथांचा वापर वाढला पाहिजे. खाजगी वाहनांचा वापर कमी झाला पाहिजे. सायकल च्या मार्गिका दुचाकी वाहनांनी वापरू नये . यासाठी आवश्यक उपाय स्थानिक स्वराज्य संस्थांकडे इन्स्टिटयूट ऑफ इंडियन इंटिरियर डिझायनर्स ,पुणे रिजिनल चॅप्टर, असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया आणि विद्यार्थ्यांनी सुचवावे. वास्तुविशारद ,आणि नगररचना महाविद्यालय आणि विद्यार्थी एकत्र येऊन शहरासाठी विचार करत आहेत हि कौतुकास्पद गोष्ट आहे. अशा विषयातील देशातील तज्ज्ञ एकत्र येऊन त्यांनी समाज प्रबोधन केले पाहिजे. त्यातून आपले शहर स्वच्छ , पर्यावरणपूरक ठेवून त्याचे सौन्दर्य वाढवण्याकडे लक्ष देता येईल. याबाबतीत सरकारी उपाययोजनांबरोबर लोकसहभाग देखील वाढण्याची गरज आहे’.
‘माझे शहर माझे वचन’ या चर्चसत्रात शहरातील प्रमुख पाच मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये वाहतूक समस्या, कचरा व्यवस्थापन , ध्वनिप्रदूषण , प्लास्टिक निर्मूलन आणि पाणी व्यवस्थापन याविषयी चर्चा करण्यात आली.
यावेळी इन्स्टिटयूट ऑफ इंडियन इंटिरियर डिझायनर्स ,पुणे रिजिनल चॅप्टरचे विष्णू भेडा आणि प्रताप जाधव, असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडियाचे बाला महाजन , हेमंत महाजन ,दर्पणा आठले ,रोटरी क्लब ऑफ पुणेचे आजी ,माजी अध्यक्ष ,सदस्य , इंटिरियर डिझायनर्स महाविद्यालयाचे विद्यार्थी ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.