पुणे :
‘बंडगार्डन आर्ट प्लाझा फेस्ट’चे उदघाटन म्हणजे माझ्या हक्काच्या जागेचे उदघाटन झाले असेच मला वाटते. भौतिक विकासापेक्षाही माणूस घडविण्याचे काम कलाकार , साहित्यिक मंडळी करत असतात. त्यामुळे मेट्रो होण्याइतकाच आर्ट प्लाझा होणेही महत्वाचे आहे. कलाकाराच्या दृष्टीने आर्ट प्लाझाचे महतव खासदार अॅड.वंदना चव्हाण यांनी ओळखलं ही खूप महत्वाची गोष्ट आहे’ असे उद्गार ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित ‘बंडगार्डन आर्ट प्लाझा फेस्ट’च्या उदघाटनप्रसंगी बोलताना काढले.
यावेळी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या,’ अन्न, पाणी , निवाऱ्यानंतर मनुष्यासाठी मनोरंजन हीच मूळ गरज आहे. त्यादृष्टीने आर्ट प्लाझाद्वारे अनेक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे’.
शहराध्यक्ष, खासदार अॅड.वंदना चव्हाण म्हणाल्या , ‘ परदेशात नदीकिनारी ,ब्रीजवर अनेक कलाकार आपली कला सादर करीत असतात. त्याच धर्तीवर ज्या कलाकारांना आपली कला लोकांसमोर सादर करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा आर्ट प्लाझा असून ‘ स्मार्ट सिटी ‘ पेक्षा ‘ हैप्पी सिटी ‘ असण्यासाठी या आर्ट प्लाझा चे महत्व आणि उपयुक्तता अधिक आहे.
महापौर प्रशांत जगताप म्हणाले, ‘ राज्यातील इतर शहरांच्या दृष्टीने विचार करता लक्षात येईल की गेल्या दहा वर्षात पुण्याचा सर्वांगीण विकास झाला आहे. नाट्यगृहे , कलादालने आणि आता आर्ट प्लाझा अशा दृष्टीने सांस्कृतिक पुण्याची शान दिवसेंदिवस वाढत आहे.
लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वाना या आर्ट प्लाझा मध्ये आनंद घेता येणार आहे. आज उदघाटन कार्यक्रमाला नागरिकांनी खूप उत्तम प्रतिसाद दिला. ‘बंडगार्डन आर्ट प्लाझा फेस्ट’मध्ये रोज सायंकाळी ४ ते ८ या वेळेत संगीत,कला,सांस्कृतिक आणि मनोरंजनपर कार्यक्रम होणार आहेत. पुण्याची संस्कृती, पुण्यासंदर्भात आकर्षक माहितीचा आनंद लुटता येणार आहे. हे सर्वांसाठी खुले आहे.
‘बंडगार्डन आर्ट प्लाझा फेस्ट’चे आयोजन पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे संयोजन पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभाग प्रमुख सनी मानकर, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रमुख मनाली भिलारे यांनी केले तर संजीवनी जोगळेकर आणि अक्षया बोरकर यांनी सहकार्य केले.
यावेळी नगरसेविका मीनल सरवदे , उषा कळमकर , मीना परदेशी, माजी आमदार बापूसाहेब पाठारे, हेरिटेज विभागाचे श्याम ढवळे अनेक मान्यवर , पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



