पुणे :
आगामी महापालिका निवडणुक २०१७ साठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस कडून इच्छुक उमेदवारांना अर्जवाटप दिनांक २६ नोव्हेंबर २०१६ पासून सुरू होणार आहे. हे अर्ज दाखल करण्यासाठी पाच दिवसांची मुदत देण्यात आली असल्याची माहिती पक्षाच्या शहराध्यक्ष, खासदार अॅड.वंदना चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली.
यावेळी महापौर प्रशांत जगताप, आमदार अॅड. जयदेव गायकवाड, अॅड.म.वि.अकोलकर, अॅड.भगवानराव साळूंखे, माजी महापौर मोहनसिंग राजपाल, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष अशोक राठी, विनायक चाचर, निलेश निकम, बाळासाहेब नवले आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
अर्ज भरून घेण्याची मुदत संपल्यावर पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील. उमेदवार लवकरात लवकर जाहीर करण्याचा पक्षाचा प्रयत्न राहील
राष्ट्रवादीचा “सक्षम उमेदवार प्रशिक्षण उपक्रम”
पत्रकार परिषदेत बोलताना त्या पुढे म्हणाल्या, ‘ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता अतिशय मनापासून समाजासाठी काम करीत असतो, परंतु महापालिका निवडणुकीच्या दृष्टिने इच्छुक उमेदवारांसाठी पुणे शहरामध्ये शहरीकरणाची आव्हाने, शहर नियोजन, सार्वजनिक वाहतूक कचरा, मलनित्सारण व पाणीपुरवठा, शाश्वत शहरे व पर्यावरण, महानगरपालिकेचे कामकाज, शाश्वत विकास दिशादर्शके व मानवी विकास निर्देशांक, राजकीय व सामाजिक सद्यस्थिती व आव्हाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे या व अशा महत्त्वाच्या विषयांवर उमेदवार अधिक पारंगत असावा, जेणे करून समाजासाठी अधिक सक्षमपणे कार्य करू शकेल, या भूमिकेतून प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. अशा प्रशिक्षित कार्यकर्त्यालाच निवडणुकीत उमेदवारीसाठी प्राधान्य देण्यात येईल, तसेच पुढील काळात स्वीकृत नगरसेवक, विविध समित्यांमध्ये नेमणुका तसेच पक्ष संघटनेत जबाबदारीची पदे देता येतील. प्रत्येक प्रशिक्षणार्थीला पक्षातर्फे प्रशस्तिपत्रक देण्यात येईल. परंतु आजी-माजी नगरसेवकांचा अनुभव लक्षात घेऊन हा उपक्रम त्यांना लागू नसेल.
शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा २०१७ पुणे महानगरपालिका निवडणूकीसाठीचा जाहीरनामा जनतेच्या सहभागातून आकाराला येत आहे. याकरीता NCP CONNECT’ हे फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत नागरिकांच्या सूचना फेसबुकच्या व समक्ष भेटून घेण्यात येत आहेत. त्यामुळे महापालिकेचा जाहीरनामा हा केवळ औपचारिक न होता, तो तज्ञ आणि नागरिकांच्या सहभागातून तयार करण्यात येत आहे.
राष्ट्रवादीचा विचार चाकोरी बाहेरचा
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचार व तत्त्वानुसार कायमच सामाजिक कार्यांना प्राधान्य दिले आहे. अवयव दान, तरुणींसाठी स्वच्छंदी भरारी अभियान, महिला सबलीकरण उपक्रम, पर्यावरण जनजागरूकता, ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम यापूर्वी राबवले आहेत व आज देखील हे उपक्रम सुरू आहेत.
गरीब व गरजू तरुण-तरुणींसाठी असलेल्या शासनाच्या व महापालिकेच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्ते करणार आहेत. त्यामध्ये या गरीब व गरजू तरुण-तरुणींना त्यांच्या आवडीचे कौशल्य शिकायला मिळावेत यासाठी नव्याने चालू झालेल्या ‘लाईट हाऊस’ उपक्रमाबद्दल माहिती देण्यात येईल. त्याची सर्व पूर्वतयारी झाली असून, या उपक्रमाची सुरुवात 1 डिसेंबर 2016 पासून करण्यात येईल.