पुणे- शहराला 24 तास पाणीपुरवठा मिळण्यापूर्वीच नवीन मीटर बसवणे हे अत्यंत चुकीचे होईल. तरी साठवण टाक्या व जुन्या जलवाहिन्या बदलल्यानंतरच पाण्याचे मीटर बसविण्याबाबत मागणीचे निवेदन पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष, खासदार अॅड.वंदना चव्हाण यांनी नुकतेच महापौर प्रशांत जगताप आणि आयुक्त कुणाल कुमार यांना दिले.
निवेदनात नमुद केल्याप्रमाणे ‘शहराला 24 तास पाणी पुरवठा करण्याच्या महत्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी करण्यास महानगरपालिकेने पहिल्या टप्प्याची सुरूवात 103 पाण्याच्या टाक्या उभारण्याच्या निवेदनाला पालिकेच्या स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली आहे. या पाण्याच्या साठवण टाक्यांचे काम पूर्ण व्हायला सुमारे दोन वर्षे लागणार आहेत. तसेच त्या पाठोपाठ 1600 किलोमीटर लांबीच्या पाण्याच्या जुन्या जलवाहिन्या बदलण्यात येणार आहेत, त्यालाही सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.
ही दोन्ही कामे पुर्ण झाल्यास नागरिकांना 24 तास पाणी मिळू शकेल, अशी महापालिकेची योजना आहे. या पूर्वी 24 तास आणि पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्यामुळे पूर्वीचे मीटर बंद पडायचे किंवा चुकीचे रिडिंग मिळत होते. त्यामुळे मीटर पद्धती बंद केली गेली होती. ज्या कारणासाठी आपण पूर्वी मीटर पद्धती बंद केली त्याचा विचार न करता, 24 तास पाणीपुरवठा मिळण्यापूर्वीच नवीन मीटर बसवणे हे अत्यंत चुकीचे होईल.
महानगरपालिका दिनांक 2 ऑक्टोबरपासून घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांच्या नळ जोडाला मीटर बसविणार असल्याचे जाहिरातींमधून पालिकेनेच सांगितले जात आहे. या पुर्वी झालेल्या चुकीची पुनरावृत्ती या निर्णयामुळे होत आहे. व याचा फटका निश्चितच नागरिकांना व पाणीपुरवठ्याच्या या योजनेला बसणार आहे. त्याबरोबर असे सुद्धा कळते की ह्या मीटर च्या ‘वॉरंटी’ चा कालावधी हा एक वर्षाचाच आहे. महानगरपालिकेच्या नियोजनानुसार चोवीस तास पाणीपुरवठा होईपर्यंत तो संपुष्टात येणार आहे. तरी मीटर खरेदीची घाई का ? असा प्रश्न जनमानसात उपस्थित होत आहे.’
पाणी साठवण टाक्या व जलवाहिन्यांचे काम पूर्ण झाल्यानंतरच घरगुती आणि व्यावसायिकांच्या नळ जोडवर मीटर बसवण्याचे काम हाती घेणे अधिक योग्य होईल अशी मागणी देखील या पत्राद्वारे करण्यात आली.
—————————— ————


