पुणे :
‘नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासोबत पालिकेच्या प्रशासनाने स्वतःची जबाबदारी ओळखून शहर कचरामुक्त करण्यासाठी त्वरित ठोस पाऊले उचलावीत’,याबाबतचे निवेदन पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष, खासदार अॅड.वंदना चव्हाण यांनी महापौर प्रशांत जगताप आणि आयुक्त कुणाल कुमार याना निवेदन सादर केले आहे.
‘सोसायटी आणि घरात अधिक आळ्या – डेंगी डासांच्या सर्वेक्षणाबाबत नागरिक उदासीन’ या व अश्या शीर्षकाखाली आजच्या दैनिकामधून वृत्त प्रसिद्ध झाले आहे – या मध्ये महपालिकेच्या सहायक आरोग्यप्रमुख डॉ.कल्पना बळीवंत म्हणतात, “शहरातील नागरिकांच्या घरांमध्ये डेंगीच्या डासांची पैदास होत असल्याचे निरीक्षण सर्वेक्षणातून पुढे आले आहे….”
हे जरी खरे असले तरी दुसऱ्या बाजूला संपूर्ण शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला असून कचरा उचलला जात नाही, त्यामुळे अस्वच्छता निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा थेट परिणाम होत आहे. पावसामुळे ह्या समस्येने उग्र स्वरूप धारण केले आहे त्यामुळे मलेरिया, डेंग्यु, चिकनगुनिया या सारख्या साथीच्या रोगांनी पुण्यात सध्या थैमान घातले आहे हे देखील प्रशासनाने लक्षात घेणे आवश्यक आहे, असे खासदार ऍड. वंदना चव्हाण यानी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
महानगरपालिका प्रशासन आपल्या जबाबदारीकडे पूर्ण डोळेझाक करत असून, नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहे.स्वच्छतेच्या विषयाबाबत या पूर्वी अनेक वेळा खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. आंदोलन देखील केले होते, मात्र प्रशासनाने त्यात आश्वासनाव्यातिरिक्त कुठलीही ठोस कारवाई किंवा उपाय योजना केल्या नाहीत. त्यामुळे या विषयाबाबत महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात.
—————————–

