पुणे :
बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीच्या निर्णयामुळे पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज आहे, मात्र या पद्धतीमुळे जबाबदारीचे विकेंद्रीकरण होऊन नवी गुंतागुंत होणार असल्याची टीका खा. अॅड. वंदना चव्हाण (शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर) यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
लोकशाही पद्धतीमधील विक्रेंद्रीकरणाच्या हेतूला धक्का पोहोचविणारा हा निर्णय आहे. त्यातून जबाबदारीच्या तत्त्वाचे उल्लंघन होणार असून, त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. कोणत्या कामासाठी कोणत्या नगरसेवकाकडे जायचे, हे नागरिकांना समजणार नाही. त्यामुळे राज्य सरकारचा हा निर्णय चुकीचा आहे. पक्षाच्या नावावर मते मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने हा राजकीय हेतूने निर्णय घेतला आहे.
निवडणूक कोणत्याही पद्धतीने झाली तरी, राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज आहे. चार सदस्य प्रभाग पद्धतीने निवडणूक लढविण्याची पक्षाची क्षमता आहे. आठही विधानसभा मतदारसंघात पक्षाचे जाळे आहे. त्यामुळे उमेदवार निवडीसाठी आमच्याकडे मुबलक पर्याय आहेत. तसेच सहकारी पक्ष काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा पर्याय खुला आहे. परंतु, आघाडी नाही झाली तरी, स्वबळावर निवडणूक लढविण्याची पक्षाची तयारी आहे. कारण गेल्या दहा वर्षांत शहराचा राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला विकास नागरिक पाहत आहेत. त्यामुळेच स्मार्ट सिटी प्रकल्पात पुण्याची देशात दुसर्या क्रमांकाने निवड झाली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही पुण्याचा गौरव होत आहे, कारण शहराच्या होत असलेल्या विकासात राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. अशी प्रतिक्रिया खा.वंदना चव्हाण यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

