पुणे :
‘हेल्मेट नसेल तर पेट्रोल पंपावर पेट्रोल दिले जाऊ नये’, या परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या प्रस्तावाला शहराध्यक्ष व खासदार वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराच्या तत्काळ कृती समितीच्या बैठकीद्वारा विरोध करण्यात आला आहे.
‘हा प्रस्ताव अव्यवहार्य आहे. आमचा हेल्मेट परिधान करण्यास विरोध नाही परंतु ज्या नियमबाह्य आदेशाद्वारे सामान्य नागरिकांना वेठीस धरले जात आहे त्याला विरोध आहे. हेल्मेट परिधान करण्याविषयी कायद्यात ज्या तरतूदी आहेत त्याच वापरल्या जाव्यात. कायद्याच्या बाहेरचे कोणतेही पाऊल उचलले जाऊ नये. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे लोकांच्या मध्ये या विषयाविषयी जागृती करणे गरजेचे आहे. त्यासाठी व्यापक मोहीम राबवणे राज्य सरकारची नैतिक जबाबदारी आहे. आम्ही देखील राजकीय पक्ष म्हणून या मोहिमेत आपणास सहकार्य करू यासाठी सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्याची सकारात्मक भूमिका राज्य सरकारने घ्यावी. पेट्रोल पंप चालकांना देखील या निर्णयाचा फटका बसणार आहे आणि मुळातच त्यांच्याकडून हेल्मेट बाबत कारवाई करण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. या अश्या निर्णयांमुळे राज्य सरकार केवळ स्वतःच्या जबादारीपासून पळवाट शोधत असल्याचे लक्षात येत आहे.असे खासदार अॅड.वंदना चव्हाण यांचे म्हणणे आहे. हेल्मेटच्या सक्तीच्या बाजूने आपण आहोत मात्र अशा अव्यवहार्य प्रस्तावांना विरोध असल्याचे त्यांनी पत्रकात म्हणले आहे.
एका बाजूला राज्यात नगर जिल्ह्यात कोपर्डीसारखी भयानक घटना घडली आहे त्यावर त्वरित कारवाई करण्याची अपेक्षा असताना हे फडणवीस सरकार हेल्मेट संदर्भात असे अव्यवर्हाय प्रस्ताव मांडत आहे हि शोकांतिका आहे. यामध्ये केवळ राजकीय षड्यंत्र असल्याचे समजते. कोपर्डीच्या घटनेमुळे लोकांचा राज्य सरकारवरील संताप अनावर झाला आहे त्याला बगल द्यायच्या उद्देशाने घाईघाईत व कुठलाही सखोल विचार न करता हा प्रस्ताव मांडला गेला आहे.
त्यामुळे राज्यसरकारच्या या अश्या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराच्या तत्काळ कृती समितीच्या बैठकीद्वारा विरोध करण्यात आला आहे. शहराध्यक्ष व खासदार वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीस तत्काळ कृती समिती सदस्य म.वि.अकोलकर, मोहनसिंग राजपाल, दत्ता धनकवडे, अप्पा रेणुसे, राजलक्ष्मी भोसले, विनायक चाचर, भगवानराव साळुंके, अशोक राठी, मनाली भिलारे, राकेश कामठे उपस्थित होते.

