मुर्दा लोग पानी के साथ बह जाते हैं। सचिन अहिरांवर नवाब मलिक यांची टीका
मुंबई:‘प्रवाहाविरोधात लढण्याची हिंमत ज्याच्याकडे असते, तो कोणत्याही परिस्थितीत ठामपणे उभा राहतो. ज्याच्याकडं ती हिंमत नसते तो प्रवाहाबरोबर वाहून जातो,’ अशी तिखट प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सचिन अहिर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पक्षांतरावर प्रतिक्रिया देताना मलिक बोलत होते. ‘अहिर यांना पक्षानं १५ वर्षे लाल दिवा दिला. त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी कठीण काळात पक्षाची साथ सोडली. त्यांचा हा निर्णय अत्यंत दु:खद आहे,’ असं मलिक म्हणाले. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे पदाधिकारी पक्षासोबतच आहेत. कुणीही अहिर यांच्यासोबत गेलेलं नाही. मुळात त्यांची ताकदच तेवढी नव्हती. तसं असतं तर ते प्रवाहाविरुद्ध पोहले असते. एखादी जबाबदारी झेपत नव्हती तर त्यांनी पक्षाला तसं सांगायला हवं होतं,’ असं मलिक म्हणाले.
अहिर यांच्या जाण्यानं राष्ट्रवादीला धक्का वगैरे अजिबात बसलेला नाही. शिवसेना व भाजप वाढत असल्याचा भ्रम आहे. पुढच्या निवडणुकीत मुंबईत आम्ही त्यांचा पराभव करू,’ असा विश्वाही मलिक यांनी बोलून दाखवला. अहिर यांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर मलिक यांनी एका हिंदी कवितेच्या ओळीही ट्विट केल्या आहेत. ते ट्विट सोशल मीडियात व्हायरल झालं आहे.