पुणे-साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे, अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप आणि श्रीगोंदयाचे आमदार राहुल जगताप हे तिनही आमदार राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाहीत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली. पुण्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले, साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे कालच मला भेटले आणि आपण पक्ष सोडून जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगरचे आमदार संग्राम जगताप आणि श्रीगोंदयाचे आमदार राहुल जगताप यांनीही फोन करून पक्ष सोडणार नसल्याचे सांगितले. माढ्याचे आमदार बबनदाद शिंदे हे मला लवकरच भेटणार आहेत..तर बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे कालच माझ्यासोबत होते असे पवार यांनी स्पष्ट केले.
पवार म्हणाले, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सत्तेचा टोकाचा गैरवापर सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर भाजप दबाव टाकत आहे..अडचणीत सापडलेल्या सहकारी संस्थांना मदत करण्याच्या नावाखाली त्यांच्यावर
भाजप प्रवेशासाठी दबाव टाकला जात आहे. हसन मुश्रीफ यांनी भाजपमध्ये जाण्यास नकार देताच त्यांच्या घरावर ईडी मार्फत छापे टाकले गेले. सत्ताधाऱ्यांकडून ईडी, सीबीआय, एसीबी यांचा वापर लोकप्रतिनिधींनी धमकवण्यासाठी केला जातो. अशाप्रकारे भाजप सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप पवार यांनी केला.
छगन भुजबळ यांनी झोपडपट्टीच्या जागेवर टीडीआर देऊन महाराष्ट्र सदन बांधल्याचा आरोप करत त्यांना अटक केली होती. आता त्याच महाराष्ट्र सदनात भाजपकडून बैठका घेतल्या जात आहेत. सुंदर महाराष्ट्र सदन बांधूनही सरकारने छगन भुजबळ यांना तुरुंगात डांबल्याचा आरोप करत पवारांनी सरकारवर टीका केली.

