परमवीर चक्र संजय कुमार ‘राष्ट्र आराधन’च्या तिसर्या पुष्पाचे अतिथी
पुणे :
कारगिलच्या युद्धात मुश्कोहच्या लढाईमध्ये पॉईंट 4875 सर करण्यासाठी जीवाची बाजी लावून लढलेल्या परमवीर चक्र विजेते आणि नायब सुभेदार संजय कुमार यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी दिनांक 18 आणि 19 फेब्रुवारीला पुणेकरांना मिळणार आहे. 1999 च्या कारगिलच्या युद्धात पराक्रम गाजवलेले आणि मृत्यूशी झुंजत विजयी झालेले परमवीर वीर चक्र विजेते नायब सुभेदार संजय कुमार हे ‘राष्ट्र आराधन’च्या तिसर्या पुष्पाचे अतिथी असणार आहेत.
वीरांकडून आपल्या धाडसाची कहाणी ऐकण्याची संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे, अशी माहिती ‘असीम फाउंडेशन’चे अध्यक्ष सारंग गोसावी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
शनिवार, दिनांक 18 फेब्रुवारी रोजी मनोहर वाढोकर सभागृह, ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी येथे सायंकाळी 5.45 ते 8 या वेळेत परमवीर संजय कुमार आपली कारगिल शौर्यगाथा बद्दल बोलणार आहेत. तसेच रविवार, दिनांक 19 फेब्रुवारी रोजी टिळक स्मारक मंदिर पुणे येथे सकाळी 8.45 ते 11 या वेळेत ‘राष्ट्र आराधन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातंर्गत झी 24 तासचे मुख्य संपादक उदय निरगुडकर संजय कुमार यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. या कार्यक्रमांची प्रस्तावना ले.ज. विनायक पाटणकर हे करणार आहेत.
1999 चे कारगिल युद्ध सर्वांच्या स्मरणात आहे. शेजारील राष्ट्राने केलेल्या विश्वासघातानंतर कोणत्याही पद्धतीने सभ्यतेचा भंग न करता भारतीय सेनेने दिलेला लढा आणि मिळवलेला विजय आपल्या सर्वांच्या मनात कायमच गर्वाचे स्थान मिळवणारा राहिला असेल. या युद्धामध्ये विजय मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. अवघड नैसर्गिक परिस्थिती आणि शत्रूकडे असणार्या मोक्याच्या जागांविरुद्ध उभे ठाकताना भारतीय भूदल, वायुदल आणि नौदलाचे शौर्य खरोखर स्पृहणीय आहे. एक भारतीय म्हणून या सर्वांबद्दल आपल्या सर्वांच्या मनात आदर आणि अभिमान असतोच फक्त तो व्यक्त करण्याची संधी प्रत्येकवेळी मिळतेच असे नाही. भारताच्या सीमावर्ती भागात काम करणार्या ‘असीम फाउंडेशन’ या संस्थेमार्फत पुणे येथे या संधीचे आयोजन केले आहे.
‘असीम फाउंडेशन’ ही संस्था गेली 16 वर्षे भारताच्या सीमावर्ती भागात कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून होणारे काम हे स्थानिक घटकांना हाताशी धरून स्थानिक विकासाच्या दृष्टीने होत असते.
संवाद-विश्वास-विकास या त्रिसूत्रीवर चालणारे हे काम सीमावर्ती भागातील आणि उर्वरित भारतातील सामान्य माणसांच्या संवादातून मैत्रीचे पूल बांधण्यासाठी होते. शिक्षण, सामाजिक उद्योजकता आणि जनजागृती या तीन प्रमुख क्षेत्रात चालणारे काम अभिलाषा, इ -मेंटॉरशिप, शिक्षक प्रशिक्षण, कोशूर क्रंच (सफरचंद अक्रोडाच्या कुकीज), संपर्क आणि मैत्री दौरे, Bed and Breakfast Tourism अशा विविध प्रकल्पांच्या माध्यमातून एकत्रितपणे चालते.
पुण्याजवळील चांदिवली येथे असीमच्या माध्यमातून ’राष्ट्रीय एकात्मता उद्याना’ची निर्मिती करण्यात आली आहे. या उद्यानामध्ये परमवीरचक्र विजेत्या 21 वीरांचे पराक्रम सांगितले असून त्याशिवाय भारताच्या एकात्मतेसमोरचे प्रश्न मांडण्यात आले आहेत. याच शूरवीरांच्या कहाण्या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी ’शौर्य’ या अँड्रॉइड अँप्लिकेशन ची निर्मिती करण्यात आली आहे. याच सूत्रामध्ये असीमने सियाचीन युद्धामध्ये अतुलनीय पराक्रम गाजवलेल्या परमवीर श्री. बाणा सिंग यांच्या अनुभव कथनाचा कार्यक्रम 28 ऑगस्ट 2016 रोजी आयोजित केला होता.
प्रत्यक्ष परमवीरचक्र विजेत्यांना भेटणे ही एक अतिशय दुर्मिळ संधी असून तिचा सर्वानी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जम्मू काश्मीरमधून 10 सरपंच, कारगिल डेव्हलपमेंट कौन्सिलचे प्रतिनिधी, पत्रकार आणि येथे शिक्षण घेणारे जम्मू-काश्मीरचे विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने याही सर्वांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिका टिळक स्मारक मंदिर येथे तसेच ‘असीम फाउंडेशन’ च्या कार्यालयात उपलब्ध असून, संपर्कासाठी 7798331947/9405994428 अथवा infoaseemfoundation.org वर संपर्क साधावा असेही यावेळी सारंग गोसावी यांनी सांगितले.