पुणे ता. ११ : एसआरए (झोपडपट्टी पुर्नवसन) योजनेंतर्गत लोहियानगर येथे १ हजार घरांच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर सुरु असून हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यावर ४५० रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर लाभणार आहे. याच योजनेच्या पुढील टप्प्यात आम्ही भीमनगर येथे एसआरए प्रकल्प उभारत असून येत्या ५ वर्षात येथील एकही व्यक्ती झोपडीत राहणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे दिली.
प्रभाग क्रमांक १६ कसबा पेठ- सोमवार पेठ येथे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचां मेळावा पार पडला. या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रभाग क्रमांक १६ येथील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गणेश बीडकर, वैशाली सोनावणे, योगेश समेळ यांच्यासह सुहास कुलकर्णी, भारत निजामपुरकर, सुशील अगज्ञान, अजय तांबट, भस्मराज तिकोने, भैया डाखवे, छोटू वडखे, स्वप्नील घाट आदी पदाधिकारी उपस्थित होते. रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी पालकमंत्री बापट म्हणाले, सर्वसमावेषक व लोककल्याणकारी योजना हा सरकारचा केंद्रबिंदू असायला हवा. मात्र, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरकारने याच्या विरोधात काम केले. त्यांनी ‘एसआरए’च्या नियमात अनावश्यक फेरफार केल्याने गरिबांचे घराचे स्वप्न भंगले. पण भारतीय जनता पक्ष सत्तेत येताच या नियमात आवश्यक बदल केले. २०२२ पर्यंत सर्वांना घर हे लक्ष्य ठेऊन ‘एसआरए’ योजना सुलभ व सोपी केली. आता बांधकाम व्यावसायिकही ‘एसआरए’प्रकल्प उभारणीत पुढाकार घेतील, याचा फायदा गरिबांना होईल.
गेल्या पंचवीस वर्षात काँग्रेस राष्ट्रवादीने जनतेला लुटले, त्यामुळेच जनतेने त्यांना घरचा रस्ता दाखवला. जे परिवर्तन देशांत आणि राज्यात झाले तेच परिवर्तन आता पुण्यातही होईल, असा ठाम विश्वास पालकमंत्री बापट यांनी व्यक्त केला. तसेच पुण्यात दादा आणि बाबांच्या आघाडीने जनता त्रासली होती, या त्रासातून त्यांची मुक्तता होण्यासाठी व मताचे विभाजन टाळण्यासाठी आम्ही रिपाईसोबत सन्मानपूर्वक युती केली. शिवसेना आमच्या सोबत आली नाही. पण तो त्यांचा निर्णय आहे . त्यांच्यावर टीका करू नका.कारण विजय आपलाच आहे. तरीही गाफील न राहता पक्षाची ध्येय, धोरणे नागरिकांपर्यत पोहचवा.असे आवाहनही पालकमंत्री बापट यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.