पुणे,
वेगवेगळे विषय घेऊन दरवर्षी ‘आर्टीट्युड’ संस्थेतर्फे ‘नववाग्गेयकार’ नृत्यमहोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाचा हा महोत्सव २७, आणि २८ फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये होणार असून मुंबईचे श्री कृष्णमुर्ती आणि पुण्याच्या स्मिता महाजन या वाग्गेयकारांच्या रचनांचे गायन आणि नृत्याचे सादरीकरण हे या महोत्सवाचे खास आकर्षण ठरणार आहे. शनिवार दि. २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मुंबईचे प्रसिद्ध गायक आणि बासरीवादक श्री कृष्णमुर्ती हे भरत नाट्यम शैलीवर आधारित स्वत:च्याच संगीतबद्ध केलेल्या रचना गातील तर रविवार दि. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता नृत्यांगना स्मिता महाजन भरतनाट्यम शैलीवर आधारित स्वत:च्याच रचना नृत्यांमधून सादर करतील. याप्रसंगी काही एकल तर सांघिक नृत्याविष्कार सादर केले जाणार असून त्यानिमित्ताने विविध भाषांमधील वेगवेगळ्या विषयांवरील रचना आणि सादरीकरणाच्या पद्धतीमधील वेगवेगळे प्रयोग यांचे समक्य दर्शन रसिक प्रेक्षकांना होणार आहे.
याशिवाय, महोत्सवाच्या तिसऱ्या आणि अंतिम सत्रात, भरत नाट्यम सादरीकरणातील पारंपरिक विषय आणि सादर करण्याच्या पद्धती यांची सांप्रत काळातील संयुक्तिकता आणि नवीन आशयाची निर्मिती या विषयावर खास परिसंवाद होणार असून त्यामध्ये प्रसिद्ध नृत्यांगना सुचेता चापेकर , शमा भाटे यांच्यासह अन्य मान्यवर आपले विचार व्यक्त करणार आहेत. परिसंवादाचा हा कार्यक्रम रविवार दि. २८ फेब्रुवारी सायंकाळी सहा वाजता पत्रकार भवनात (गांजवे चौक) होणार आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये होणाऱ्या गायन आणि नृत्य महोत्सवास प्रवेशमूल्य आहे मात्र परिसंवाद सर्व रसिकांसाठी खुला ठेवण्यात आला आहे.
‘नववाग्गेयकार’ नृत्यमहोत्सवाचे आयोजन
Date:


