पुणे: महिलांचे जन्मपूर्व आणि जन्मपश्चात मानसशास्त्र आणि आरोग्यविषयक काम करणारी अमेरिकेतील संस्था एपीपीपीएचआणि गेल्या 60 वर्षांपासून काम करणारी भारतीय एनजीओ मनशक्ती रिसर्च सेंटर (एमआरसी) ने एकत्र येऊन तीन दिवसीय जागतिक परिषदेचे आयोजन केले आहे. 18 जानेवारीपासून सुरु होणार्या या परिषदेत सहभागी डॉक्टर्स जगभरात प्रसुतीवेळी घेतल्या जाणार्या जन्मपूर्व काळजीबाबत विचारविनीमय करत आपले अनुभव व्यक्त करणार आहेत.
आज बाळाच्या जन्मपूर्व काळजीबाबत तरुण जोडपी तसेच डॉक्टरांमध्ये सुद्धा अनेक मिथके आणि गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करण्यासाठी18 जानेवारीपासून लोणावळ्यात सुरु होणार्या या प्रकारच्या पहिल्याच जागतिक परिषदेत भारतातील जुन्या पारंपारिक तसेच आधुनिक वैज्ञानिक पध्दतींची चर्चा करण्यात येईल.
अशा संकल्पना आणि कार्यपध्दती तपासून पाहण्यासाठी वैद्यकीय विज्ञानात वूम्ब इकोलॉजी नावाची शाखा सुरु करण्यात आली आहे. परंतु दुर्दैवाने सर्वात आघाडीवर असणार्या वैद्यकीय व्यावसायिकांनाही त्याबाबत फारशी माहिती नाही.
एपीपीपीएच संस्थेचे संस्थापक, डॉ. थॉमस वेर्नी यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, “आमच्या संस्थेचा मुख्य उद्देश आहे तो म्हणजे ‘वूम्ब इकोलॉजीला वर्ल्ड इकोलॉजी बनवणे’. बालकांच्या जन्मपूर्व आणि जन्मपश्चात आजारांचा अभ्यास करुन त्यांच्यावरील उपचारांच्या पध्दती शोधणे तसेच बालकांसोबत त्यांच्या मातापित्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यातसुधार आणण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत.”
फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रीक अँड गायनेकोलॉजीकल सोसायटीज ऑफ इंडिया (FOGSI) च्या मान्यतेने आयोजित होणार्या या परिषदेत जन्मपूर्व विकासाचे प्राचीन प्राचीन ज्ञान आभण अत्याधुनिक शास्त्र- गर्भातून नव्या आरोग्यदायी जगाची निर्मिती) यावर अधिक लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
धन्वंतरी पुरस्कार विजेत्या, नामांकीत बालरोगतज्ञ आणि मुंबई विद्यापीठाच्या माजी उपकुलपती डॉ. स्नेहलता देशमुख परिषदेत प्रामुख्याने मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी त्या ‘माझा प्रवास- बालशल्यचिकित्सा ते संस्कार’ या विषयावर मार्गदर्शन करतील.
त्यांनी सांगितले की, “अनेक लोक जन्मपूर्व काळजीकडे एक नवीन फॅड या दृष्टीकोनातूनच पाहतात. मात्र भारतात हीच पध्दती संस्कार (सद्गुण) या नावाने खूप आधीपासून प्रचलीत आहे. या पध्दतीमधून स्पष्ट झाले आहे की, बाळ गर्भावस्थेत असल्यापासूनच गर्भ संस्काराच्या माध्यमातून त्याच्यामध्ये सद्गुण भरणे शक्य आहे. परंतु सर्वसामान्य जोडपी याबाबत अजूनही गोंधळलेल्या मन:स्थितीतच असतात.”
पुणे येथील अनुवांशिक आणि बालरोगतज्ञ डॉ. प्रकाश गंभीर सांगतात की, “याबाबतचे आणखी एक कटू सत्य म्हणजे काही पाश्चिमात्य वैद्यकीय पध्दती आणि भारतीय विचार यांच्यात खूपच तफावत दिसून येते. सध्याच्या उपचार पध्दतींमध्ये केवळ जैवीक प्रक्रियांनाच प्राधान्य दिले जाते. त्याचा पुढील टप्पा असणार्या मानसिक आणि सामाजिक घटकांना महत्व दिले जात नाही. मातेच्या शरीराला आवश्यक असणारे अन्न, आवश्यक असणारा व्यायाम आणि औषधे यांचीच फक्त चर्चा केली जाते. परंतु तिची मानसिक अवस्था, तिने वाचणे आवश्यक असणारे साहित्य किंवा त्या अवस्थेत ऐकावे असे संगीतही तितकेच महत्वाचे आहे.” या परिषदेत डॉ. प्रकाश गंभीर जन्मपूर्व अवस्थेत अनुवंशिक आणि एपिजेनेटिक्सची भूमिका या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
एमआरसी आणि त्याचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांनी जागतिक स्तरावर या विषयावर काम केले आहे, त्यांच्या मते,गर्भसंस्कारांनी प्राचीन ज्ञानाचा वैज्ञानिक पद्धतीने उपयोग केला आहे. स्वयंसेवकांच्या समर्पित कार्यसंघासह एमआरसी या विषयावर अव्यवसायिक स्तरावरील कार्यशाळा आणि प्रशिक्षण शिबिरे आयोजित करीत असते.
मागील एका दशकातच 1,25,000 पेक्षा जास्त पालकांनी एमआरसी च्या साप्ताहिक कार्यशाळेत भाग घेतला आहे. या एनजीओचे संशोधन संचालक, गजानन केळकर यांनी सांगितले की, “आमच्याकडून एक दिवसीय कार्यशाळा, तीन दिवसीय शिबिरे,इलेक्ट्रॉनिक चाचण्या आणि इतर अशा प्रकारच्या व्यायामांचे प्रशिक्षण घेतले जाते.”
कॅनडाच्या एपीपीपीएच संस्थापक डॉ. थॉमस वेर्नी यांच्या व्यतिरिक्त, ब्रिटनचे आघाडीचे एपिजेनिटिसिस्ट चरण सुर्धर आणि ब्राझिल, नेदरलँड आणि अमेरिकेतील अनेक तज्ञ या परिषदेस संबोधित करतील.
भारतातील प्रमुख वकत्यांमध्ये डॉ. संजय गुप्ते (पुणे), डॉ. जयदीप मल्होत्रा (FOGSI इंडियाचे अध्यक्ष) आणि बेंगलुरूच्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ मेंटल हेल्थ आणि न्यूरोसायंसेस (एनआयएमएचएन्स) यांचा डॉ. प्रभा चंद्रा यांचा समावेश आहे.
डेक्कन कॉलेज (पुणे) मधील डॉ. विनया क्षीरसागर आणि मुंबईच्या वैशाली दबके यांसारखे अनेक भारतीय तज्ज्ञ गर्भ संस्कारांचे प्राचीन संकल्पना देखील सादर करतील.