मुंबई -आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसे-भाजपचे साटेलोटे झाले आहे. भाजपला मुंबई मनपा निवडणुकीत फायदा होण्यासाठीच मनसेची स्टंटबाजी चालू आहे. नुकतेच घाटकोपरमध्ये उत्तर भारतीय फळविक्रेत्याला मारहाणीचा प्रकार वृत्तवाहिन्यांनी दाखवला. घाटकोपर मारहाणीची क्लिप वायरल झाली, वृत्तवाहिन्यांवर बातम्या आल्यानंतरही गुन्हा दाखल होत नसेल तर यावरून मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा असल्याचे सिद्ध होते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी मतांचे विभाजन करून सत्ता मिळवण्याचे दोन्ही पक्षांचे प्रयत्न आहेत. अशी मारहाण केल्यामुळे उत्तर भारतीय लोक घाबरून भाजपला मतदान करतील, अशी यामागची अटकळ असावी, असेही मलिक म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी लिट्टी चोखा सारख्या उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमांना हजेरी लावून उत्तर भारतीयांना जवळ करण्याचा प्रयत्न केल्याचे नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले
तर राज ठाकरेंनी धान्याचे साठे करणाऱ्या अदानी आणि गोदरेजच्या गोदामांवर हल्ले करावेत
पोलिसांवरील हल्ले हे जास्तीत जास्त भाजप सेनेतील राजकारण्यांकडून होत आहे .भाजपाने पोलिसांवर दबाव टाकू नये, पोलिसांच्या कामात ढवळाढवळ करु नये, त्यानंतरच स्थिती सुधारु शकेल, असे सांगून मलिक म्हणाले ,. मनसेकडून फळ विक्रेत्याला मारहाण होणे यात मुख्यमंत्र्यांचे कारस्थान आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी मतांचे विभाजन करुन त्याचा भाजपला लाभ करुन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांना हाताशी धरुन हा डाव आखला आहे, असा आरोप मलिक यांनी केला. गरीबांच्या हक्कासाठी राज ठाकरे लढत असतील तर त्यांनी हजारो टन धाण्याचे साठे करणाऱ्या अदानी अणि गोदरेज या कंपन्याच्या गोदामावर हल्ले करावेत, असा सल्ला ही त्यांनी दिला.
शरद पोंक्षे यांनी स्वतः माती खावी ,इतरांना खाण्याचा सल्ला देवू नये
मराठी अभिनय क्षेत्रातील कलाकार शरद पोंक्षे यांनी इको फ्रेंडली बकरी ईदवर मांडलेल्या भूमिकेवर नवाब मालिक यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, की इस्लाममध्ये बकरी ईदला बकऱ्यांची बळी देण्याची परंपरा गेली १८०० वर्षापासून सुरू आहे. कुर्बानी झाल्यानंतर ते मांस गरीब जनतेत वितरित केले जाते. मातीचा बकरा करुन हे शक्य होणार नाही. शरद पोंक्षे हे माती खात असतील त्यांनी इतरांना माती खाण्याचा सल्ला देऊ नये, असे मलिक यांनी यावेळी म्हटले आहे

