पुणेकरांसाठी २०० देशांमधील चलनी नोटांचा संग्रह पाहण्याची संधी
पुणे-खास उन्हाळ्याची सुट्टी व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पुण्यातील चतुःशृंगी मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या सांस्कृतिक भवन हॉल येथे एक खास प्रदर्शन महाराष्ट्र नाणकशास्त्र परिषदेचे कार्यवाह देवदत्त अनगळ यांनी आयोजित कलेले आहे. प्रदर्शनामध्ये देवदत्त अनगळ यांच्या संग‘हातील २०० पेक्षा जास्त देशांमधील विविध चलनी नोटा पाहण्याची संधी यानिमित्ताने पुणेकरांसाठी चालून आलेली आहे. शनिवार दि. ३० एप्रिल पासून २ मे २०१७ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत हा संग‘ह पाहता येणार आहे. या प्रदर्शनामध्ये भारतामध्ये जेव्हा इंग्रजांची सत्ता होती तेव्हाच्या व्हाईसरॉयच्या सही असणार्या नोटा, इस्त्राईलमध्ये छापल्या गेलेल्या आईनस्टाईन या शास्त्रज्ञाचा ङ्गोटो असणार्या नोटा, दुसर्या महायुध्दामध्ये काही काळासाठीच वापरासाठी बनविलेल्या, स्टॅम्प लाऊन अधिकृत केलेल्या काही दुर्मिळ नोटा, प्राण्यांचे ङ्गोटो छापलेल्या नोटा अशा विविध प्रकारच्या नोटा एकाच ठिकाणी प्रत्यक्ष पाहयला मिळणार आहेत. पाकिस्तान, भूतान, बांग्लादेश, थायलंड, म्यानमार, चीन, कंबोडीया, श्रीलंका, मलेशिया, नेपाळ या भारताजवळच्या देशांपासून ते रशिया, अमेरिका, युरोप, अफ्रीकेतील अनेक देश, ऑस्ट्रेलिया, इराण, इराक,
जर्मनी, जपान, इजिप्त, इंग्लड, फ्रान्स वगैरे आपल्या माहितीत असलेल्या देशांपासून ते अगदी लहान व कमी लोकसंख्या असणारे झिंबाब्वे, लिबीया, आयर्लंड, मादागास्कर, माल्टा, ओमान, पेरु, पोलंड, रवांडा, घाना, सोमालिया इत्यादी सुमारे दोनशे हून अधिक देशांच्या चलनी नोटा या प्रदर्शनामध्ये पाहण्यास उपलब्ध असणार आहेत. चलनी नोटा जमविण्याचा हा छंद अनगळ यांनी अगदी लहान वयापासून म्हणजे सत्तर वर्षांपूर्वीपासून जपलेला आहे. या चलनांचा अभ्यास करणारे एक प्रमुख संशोधक म्हणून त्यांचे नाव भारतात प्रसिध्द आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे…नोटा या नाण्यांपेक्षा कमी टिकणार्या असतात, त्यामुळे त्या काही वर्षांनंतर दुर्मिळ होत जातात. पूर्वी नोटा छापणे म्हणजे प्रत्येक नोट एकसारखी छापणे, हे अत्यंत अवघड काम होते. तरीही त्या त्या देशांनी आपल्या नोटांवर त्यांची संस्कृती, महत्त्वाच्या वास्तू, महान व्यक्ती, प्राणी यांच्या प्रतिमा छापून आपापले वेगळेपण दाखविण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. संग्रहकांच्या दृष्टीने नोटा या चांगल्या स्थितीत असणे व त्यांचा दुर्मिळपणा या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. काही देशांमध्ये तर प्लास्टिक पासून बनविलेल्या टिकावू नोटा वापरण्यास सुरुवातही झालेली दिसते. सध्याच्या काळात नवीन तंत्रज्ञानामुळे हुबेहुब नोटा छापून गैरप्रकार करणारे अनेक लोक असतात, त्यामुळे यातील खोटेपणा ओळखण्यासाठी या नोटांवर असलेले सुरक्षिततेचे सांकेतांक वगैरे गोष्टींचा अभ्यास प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. तसेच नवीन पिढीमध्ये जास्तीत जास्त तरुणांनी मोबाईल व टीव्ही मध्ये वेळ न दवडता असे छंद जोपासावेत…की ज्यायोगे त्यांचे मनोरंजन तर होईलच पण अभ्यास व संशोधकवृत्ती वाढीस लागून मेंदूचा चांगला व्यायामही होईल. एक चांगली गुंतवणूक म्हणूनही या छंदाचा उपयोग हाऊ शकतो. यासर्व गोष्टी पुणेकरांच्या नजरेसमोर आणण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित करत असल्याचे देवदत्त अनगळ यांनी सांगितले.